Moshi Crime : तरुणीच्या नावाचा, कागदपत्रांचा वापर करून कर्ज देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक

एमपीसी न्यूज – तरुणीच्या नावाचा, फोटोचा आणि कागदपत्राचा गैरवापर करून एका महिलेने अनेकांना मुद्रा योजने अंतर्गत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी अनेकांकडून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली प्रत्येकी तीन हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली.

हा प्रकार 20 मार्च 2020 रोजी भारत माता चौक, मोशी येथे घडला. प्रियंका कोठाडे असे नाव सांगणा-या अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नेहा सुनील पडगमकर (वय 25, रा. भारतमाता चौक, मोशी) यांनी शनिवारी (दि. 24) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या नावाचा, फोटोचा आणि कागदपत्रांचा गैरवापर केला. त्याद्वारे अनेक लोकांना मुद्रा लोन पाहिजे का असे विचारून त्यांच्याकडून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली प्रत्येकी तीन हजार रुपये भरावे लागतील असे म्हणून नागरिकांची फसवणूक केली. तसेच काही नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत भारतीय दंड विधान कलम 419, 420, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (सी) (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.