Moshi Crime News : अपघाताच्या ठिकाणी भांडण सुरु असल्याने भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण

मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – विरुद्ध दिशेने आलेल्या तरुणाच्या दुचाकीचा एका वाहनाला धक्का लागल्याने अपघात झाला. त्यांनतर दोघांनी मिळून विरुद्ध दिशेने येणाऱ्या तरुणाला मारहाण केली.

याबाबत नियंत्रण कक्षाला माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी गेले असता मारहाण करणाऱ्या एकाने पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून मारहाण केली. ही घटना अथर्व हॉटेल समोर, जुना जकात नाका, मोशी येथे सोमवारी (दि. 9) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

सुजित चंद्रकांत जाधव (वय 24, रा. हनुमान नगर, भोसरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस कर्मचारी संजय बाबासाहेब थेटे यांनी या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस कर्मचारी संजय थेटे हे बिट मार्शल म्हणून कर्तव्यावर होते. त्यावेळी त्यांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली कि, मोशी येथील जुना जकात नाक्याजवळ अपघात झाला आहे. त्यानुसार फिर्यादी थेटे घटनास्थळी गेले. त्यावेळी अक्षय सोपान हजारे आणि आरोपी सुजित जाधव व आरोपीचे वडील चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव (वय 54) यांच्यात भांडण सुरू होते. अक्षय हजारे विरुद्ध दिशेने दुचाकीवरून आल्याने त्याच्या दुचाकींचा धक्का एका वाहनाला लागला. त्यात एकजण जखमी झाला. त्यावरून अक्षय याच्यासोबत आरोपी सुजित आणि त्याचे वडील भांडण करत होते.

फिर्यादी हे त्यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी गेले असता आरोपी सुजित याने फिर्यादी यांच्या वर्दीच्या शर्टची कॉलर पकडली. तू आमच्यामध्ये कशाला येतो, असे आरोपी फिर्यादीला म्हणाला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या डाव्या गालावर चापट मारून फिर्यादीला धक्काबुक्की केली. त्यानुसार सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सुजित जाधव याला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.