Moshi crime News : तरुणीला फूस लाऊन पळवल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – तरुणीला फूस लाऊन पळून नेल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तरुणीला पळवून नेत असताना तरुणीच्या मामाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांना टेम्पोने धक्का देऊन जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 5) सकाळी साडेअकरा वाजता गायकवाड वस्ती, मोशी येथे घडली.

शुभम शांताराम आतकरी (वय 22, रा. शिरोली सुलतानपूर, ता. जुन्नर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पळवून नेलेल्या तरुणीच्या बहिणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला आणि त्यांचे मामा गावी जाण्यासाठी सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता निघाले होते. ते इमारतीच्या खाली आले असता फिर्यादी यांची बहिण पळत जाऊन आरोपीच्या पिकअप टेम्पो (एमएच 14 / एचजी 9254) मध्ये बसली.

फिर्यादी यांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादी यांच्या मामाने देखील पिक अपला अडवण्याचा प्रयत्न केला, यात फिर्यादी यांच्या मामाला पिक अपचा धक्का लागून ते जखमी झाले. त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.