Moshi Crime News : शेळ्यांनी हरब-याचे नुकसान केल्याचा जाब विचारणाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

चार जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – शेळ्यांनी हरब-याचे नुकसान केल्याचा जाब विचारला म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच, मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागेश्वर कॉलनी, मोशी याठिकाणी गुरुवारी (दि.29) दुपारी एक वाजता हा प्रकार घडला.

याप्रकरणी श्रीदेवी गुरुनाथ जाधव (वय 35, रा. नागेश्वर नगर, भूमाता चौक, मोशी) यांनी शुक्रवारी (दि.30) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अंजना साळुंखे (वय 50), सुवर्णा साळुंखे (वय 35), अक्की साळुंखे (वय 22) व मयूर साळुंखे (वय 25) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपींना शेळ्यांनी हरब-याचे नुकसान केल्याचा जाब विचारला. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांच्या घरी जाऊन फिर्यादी, तसेच यांचे पती व भाऊ यांना मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली असं फिर्यादीत म्हटले आहे.

भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.