Moshi Crime News : फिल्मी डायलॉगसह कोयता घेऊन सोशल मीडियावर दहशत निर्माण केल्याप्रकरणी तरुणाला अटक
एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे लोखंडी काेयता बाळगला. तसेच कोयत्याचा व्हिडिओ, फिल्मी डायलॉगसह सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण केली. या प्रकरणी तरुणाला गुंडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक केली. ही घटना मोशी – देहूगाव रस्त्यावर मोशी येथे बुधवारी (दि. 1) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
आकाश राजाराम भिसे (वय 24, रा. मोशी), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस कर्मचारी गणेश शंकर मेदगे यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने लोखंडी कोयता बेकायदेशीर बाळगला. तसेच कोयत्यासह व्हिडिओ तयार केला. ‘तूम कानून तोड रहे हो… पुरानी आदत है युवर ऑनर… वो तो बचपनसे कर रहा हूं…’, असे फिल्मी डायलाॅग असलेला कोयत्याचा तो व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया ॲपवरून व्हायरल केला. यातून दहशत निर्माण केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने कारवाई केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून 200 रुपयांचा एक लोखंडी कोयता जप्त केला. सहाय्यक फौजदार दीपक रणसौर तपास करीत आहेत.