Moshi crime News : तडीपार आरोपीकडून पोलिसांना धक्काबुक्की

एमपीसी न्यूज – तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच शहरात आढळून आलेल्या आरोपीवर कारवाई करण्यासाठी त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

ही घटना सोमवारी (दि. 1) सकाळी साडेदहा वाजता भारत माता चौक, मोशी येथे घडली.

शुभम बाळू खरात (वय 23, रा. संजय गांधी नगर, मोशी) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस शिपाई विजय दीपक दौंडकर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 13 सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. त्यात आरोपी शुभम खरात याला देखील तडीपार करण्यात आले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्याअगोदरच तो शहरात आढळून आला.

याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला भारत माता चौक, मोशी येथून ताब्यात घेतले. पुढील कारवाई करण्यासाठी त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना आरोपी शुभम याने पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली.

याबाबत त्याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.