Moshi : पोहण्याच्या तलावात पडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मोठ्या वसाहतीत नवीन फ्लॅट बघण्यासाठी आई वडिलांसोबत गेलेल्या आठ वर्षीय मुलाचा सोसायटीतील पोहण्याच्या तलावात पडल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 15) बोऱ्हाडेवाडी मोशी येथे घडली.

तनिष्क अर्जुन कोल्हे (वय 8, रा. रेणुका अपार्टमेंट, समर्थ कॉलनी, दळवीनगर, चिंचवड) असे पोहण्याच्या तलावात पडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन कोल्हे हे एका कंपनीत काम करतात. त्यांना त्यांची नोकरी आणि मुलांच्या शाळा यांना जवळ पडणाऱ्या ठिकाणी घर घ्यायचे होते. बुधवारी ते बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील साई फॉर्च्युन येथे घर पाहण्यासाठी गेले. त्या वासहतीमध्ये पोहण्याचा तलाव असल्याने तनिष्क खाली थांबला. त्याचे आई-वडील फ्लॅट बघण्यात गुंतले. दरम्यान तनिष्क पोहण्याच्या तलावाजवळ गेला. मोठ्यांसाठी आणि एक लहान मुलांसाठी असे दोन तलाव आहेत. त्याच्या मधल्या भिंतीवरून जात असताना तनिष्क अचानक मोठ्यांच्या पोहण्याच्या तलावात पडला. आई-वडिलांचे फ्लॅट बघून झाल्यावर तनिष्कची शोधाशोध सुरू झाली. तोपर्यंत तनिष्कने तलावाचा तळ गाठला होता. सुखाच्या उंबरठ्यात प्रवेश करण्याआधीच कोल्हे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.