Moshi : शॉर्टसर्किटमुळे कंपनीत आग; सुमारे 10 लाखांचे नुकसान

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने बोऱ्हाडेवाडी येथील एका कंपनीत आग लागली. या आगीत कंपनीतील साहित्य जळाले असून सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अग्निशमन विभागाला कंपनीकडून सांगण्यात आले आहे. ही आग आज, गुरुवारी (दि. 7) दुपारी साडेबाराच्या सुमारास लागली.

देहू-आळंदी रोडवर, बोऱ्हाडेवाडी येथे तुषार भालचंद्र कोलते यांची ओमकार डाइज प्रा. लि. ही कंपनी आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास कंपनीत इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाले आणि आग लागली. घटनेची माहिती मुख्य अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानुसार मुख्य विभागाचा एक, चिखली, तळवडे आणि भोसरी या उपविभागांचे तीन असे एकूण चार बंब घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मिळून 24 जण घटनास्थळी उपस्थित होते. तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीमध्ये कंपनीतील मेंटेनन्सचे साहित्य, कागदपत्रे, तीन संगणक, सीसीटीव्ही कॅमेरे, कपाट, सहा खुर्च्या, तीन पंखे, एसी मशीन, केबल वायर आणि पहिल्या मजल्यावरील केबिन जळाले आह.

या आगीमध्ये सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.