Moshi : बंद फ्लॅटला आग; इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोका टळला

एमपीसी न्यूज – मोशी येथील एका रहिवासी सोसायटीमध्ये बंद फ्लॅटला आग लागली. सोसायटीमधील सतर्क नागरिकांनी इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा चालू करून आग पसरू दिली नाही. तसेच इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेचा अग्निशमन विभागाला आग विझवण्यासाठी मोठा फायदा झाला. वेळीच घरातून आणि ड्राय बाल्कनीमधून एकूण दोन सिलेंडर बाहेर काढण्यात आले. यामुळे संभाव्य धोका टळला. ही घटना आज (सोमवारी) सकाळी पावणेअकराच्या सुमारास गंधर्व एक्सलन्स सोसायटी मोशी येथे घडली.

विनायक बोंगाळकर यांची मोशी-चिखली रोडवर गंधर्व एक्सलन्स सोसायटी डेव्हलपर्स ही रहिवासी सोसायटी आहे. या इमारतीमध्ये बाराव्या मजल्यावर 1202 या फ्लॅटमध्ये स्वप्नील सुनील डुबेरकर यांचे कुटुंब राहते. डुबेरकर दाम्पत्य आज सकाळी नोकरीनिमित्त बाहेर गेले.

  • सकाळी पावणेअकराच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटला आग लागली. डुबेरकर यांच्या फ्लॅटमधून धूर येत असल्याचे पाहून सोसायटी मधील सतर्क नागरिकांनी फ्लॅटचे लॉक तोडून इमारतीमध्ये लावलेली अग्निशमन यंत्रणा सुरू केली. यामुळे आग किचन पर्यंत आली नाही.

अग्निशमन विभागाला घटनेची महिती मिळताच चिखली अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी किचनमधून एक गॅस सिलेंडर आणि ड्राय बाल्कनीमधून एक असे दोन सिलेंडर बाहेर काढले. सिलेंडरपर्यंत आग न पोहोचल्यामुळे इमारतीमध्ये होणारा संभाव्य धोका टळला.

  • इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असल्याने आगीचा संभाव्य धोका टळला. बांधकाम प्रकल्पाच्या कर्मचा-यांना तात्काळ कामाला लावून घरामधील वस्तू हलविण्यात आल्या. आगीत फ्लॅटमधील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, धान्य, इलेक्ट्रिकल वायरिंग बोर्ड जळून खाक झाले. तसेच आगीच्या उष्णतेमुळे फ्लॅटचे पीओपी कोटिंग आणि काँक्रीटला तडे गेल्यामुळे मोठे नुकसान झाले.

इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, दिलीप कांबळे, भरत फाळके, बाळासाहेब वैद्य, सुनील फरांदे, अनिल माने, रुपेश जाधव यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.