Moshi : ‘आरटीओ’मधील फसवणुकीचा आणखी एक प्रकार उघड; 27 जणांवर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – परिवहन विभागाकडून रिक्षा परमिट मिळविण्यासाठी पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर आणखी एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑटोरिक्षा बॅचसाठी बनावट रहिवाशी दाखले परिवहन विभागाला दिले आहेत. याप्रकरणी 27 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महम्मद अली हबीब अली सय्यद (रा. ओटास्कीम, निगडी), शिवाजी शंकर डोलारे (रा. देहूरोड), मुबारक महेबूब शेख (रा. ओटास्कीम, निगडी) आणि अन्य 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोरिक्षा बॅचसाठी अनेक कागदपत्रे लागतात. त्यापैकी बनावट रहिवासी दाखले आरोपींनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड येथे सादर केले. कागदपत्रांची पडताळणी करत असताना परिवहन विभागाच्या अधिका-यांच्या ही बाब लक्षात आली. 19 जानेवारी 2019 ते 7 फेब्रुवारी 2019 या कालावधीत हा प्रकार घडला. त्यानुसार ही बनावट कागदपत्रे सादर करणा-या एकूण 27 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

ऑगस्ट 2019 मध्ये पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील चारित्र्य पडताळणी विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांना रिक्षा परमिटसाठी लागणारे पोलिसांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळाले. त्यावरून पिंपरी-चिंचवड आरटीओ येथे काहीजण स्वयंघोषित एजंट म्हणून काम करत असून ते पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिले जात होते. एजंटच्या स्वयंघोषित टोळीने पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांची बनावट सही व पोलीस आयुक्तालयाचा बनावट शिक्का तयार केला. त्याद्वारे ते बनावट कागदपत्रे तयार करून रिक्षा परमिटसाठी त्याचा वापर करीत. या बदल्यात एका परमिट धारकाकडून 15 हजार ते 80 हजार रुपयांपर्यंत ही टोळी पैसे उकळत होती. हा प्रकार मागील वर्षभरापासून सुरू होता.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने संबंधित एजंटची माहिती काढली. त्यांची नावे आणि त्यांच्या थांबण्याची ठिकाणे, कार्यालयात येण्याची-जाण्याची वेळ, परवान्याचे कागदपत्र, त्यांच्या कामकाजाची वेळ, त्यांचे सहकारी याबाबतची माहिती शोधून काढली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा एकच्या पोलिसांनी सुरुवातीला तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांची चौकशी करून आणखी चार जणांना ताब्यात घेतले. सात जणांकडून बनावट सही व शिक्क्याची वेगवेगळ्या मजकुराची एकूण 88 बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रे जप्त केली. तसेच काही शाळांचे शाळा सोडल्याचे कोरे दाखले, मुख्याध्यापकांच्या सहीचे कोरे दाखले, काही परिपूर्ण सही शिक्क्याचे दाखले, तहसीलदारांचे रहिवासी प्रमाणपत्र आढळून आले. पोलिसांनी कसून चौकशी करत आरोपींकडून चार वाहने, संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर असा एकूण 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.