Moshi : व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – वायफाय आणि इराणी कॅफे हॉटेलचा व्यवसाय करण्यासाठी माहेरहून लाखो रुपये आणण्याची मागणी केली. तसेच पैसे न आणल्याने विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण करून घरात न राहण्याची धमकी दिल्याप्रकरणी पती, दीर आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश लक्ष्मण रोडे, गणेश लक्ष्मण रोडे, पार्वती लक्ष्मण रोडे (सर्व रा. मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 21 वर्षीय विवाहितेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 20 जून 2019 ते 8 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडली. आरोपींना येरवडा भागात वायफाय आणि इराणी कॅफे हॉटेलचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांनी विवाहितेकडे माहेरहून तीन लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यावरून विवाहितेला टोचून बोलून शिवीगाळ करत मारहाण केली.

तसेच पैसे न आणल्यास ‘आमच्या घरात राहू नकोस’ अशी धमकी देत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. या भांडणांबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या भरोसा सेलने मध्यस्थी करून समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही बाजूंनी समजून न घेतल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.