Moshi : आरटीओ मधील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी मालवाहतूक वाहनांचा कोटा वाढला

एमपीसी न्यूज – उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी मालवाहतूक वाहनांच्या दररोज मोशी आरटीओ कार्यालयाबाहेर रांगा लागत असल्याने या वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाईन तारीख घेऊन महिनाभर वाट पाहण्यापासून वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सागरे यांनी याबाबत माहिती दिली. ठराविक कालावधीनंतर मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांना आरटीओ कार्यालयाचे योग्यता प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात मालवाहतूक वाहनांसाठी 145, टुरिस्ट टॅक्सी 50, ऑटोरिक्षा 50, तीनचाकी मालवाहतूक वाहने 10, बस 30 असा कोटा ठेवण्यात आला आहे.

सध्या बसेसचा कोटा 30 आहे. मात्र, दररोज 30 बसेसचे योग्यता प्रमाणपत्र घेण्यासाठी बुकिंग होत नाही. तर त्याउलट मालवाहतूक वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. योग्यता प्रमाणपत्र घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर तब्बल महिन्याभरानंतर या वाहनांची तपासणीची तारीख येते. त्यामुळे मालवाहतूक वाहनांना महिनाभर प्रतीक्षा करावी लागते. मालवाहतूक वाहनांची संख्या जास्त असल्याने त्या वाहनांचा तपासणी कोटा वाढवण्यात येत आहे. तर बसेसचा कोटा कमी करण्यात आला आहे.

प्रत्येक सोमवार आणि शुक्रवारी बसेसचा कोटा 30 असेल तर अन्य दिवशी 15 कोटा असणार आहे. मालवाहतूक वाहनांसाठी प्रत्येक सोमवार आणि शुक्रवारी 145 वाहनांचा कोटा असेल. तर अन्य दिवशी मालवाहतूक करणा-या वाहनांचा कोटा 160 असणार आहे. हा कोटा वाढवल्यामुळे वाहनांच्या तपासणीची तारीख जवळची मिळेल, याचा वाहन धारकांना फायदा होणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सागरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.