मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Moshi Hospital : 850 खाटांचे रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा; आरक्षण हस्तांतरणास जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका (Moshi Hospital) हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर सुमारे 20 वर्षे पायाभूत सुविधांपासून वंचित असलेल्या समाविष्ट गावांतील सर्वात मोठे अर्थात 850 खाटांचे रुग्णालय उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मोशी येथील गायरान जमीनीवर प्रस्तावित हॉस्पिटल होणार असून, संबंधित जागेचा ताबा महापालिका प्रशासनाला देण्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघातील जिल्हा प्रशासनाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांबाबत 12 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार महेश लांडगे यांनी बैठक घेतली होती. चिखली, मोशी, चऱ्होली या भागात जागा निश्चित करुन मोठे हॉस्पिटल उभारण्यासाठी जागेची निश्चित करावी. तसेच, यशवंतराव चव्हाण रुग्णालयावरील ताण कमी व्हावा. याकरिता समाविष्ट गावांमध्ये अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून उभारावे, असा संकल्प होता. त्यासाठी चिखली, मोशी, चऱ्होली या गावांतील जागा जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली होती.

दरम्यान, अवघ्या 7 दिवसांत प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत मोशी येथील प्रस्तावित जागेचा रुग्णालयाच्या  उभारणीसाठी ताबा देण्यासाठी मंजुरी दिली आहे. यापूर्वी, चिखली येथील जागा रुग्णालयासाठी प्रस्तावित होती. मात्र, सदर जागा वनविभागाच्या अंतर्गत येत असल्याने जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर मोशी येथील जागा निश्चित करण्यात आली. त्याला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हिरवा कंदिल (Moshi Hospital) दाखवला आहे. त्यामुळे चिखलीजवळ आणि मोशीत 860 बेडचे हॉस्पिटल उभारणीचा मार्ग मोकळा झाला.

मौजे मोशी, ता. हवेली येथील ग. नं. 646 पै. मधील आरक्षण क्रमांक 1/189 मनपा उपयोग (हॉस्पिटल) जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेस मनपा उपयोग या प्रयोजनार्थ आगाऊ ताबा देण्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने हॉस्पिटल या प्रयोजनासाठी जमीन हस्तांतरण करण्याबाबत मागणी केली होती.

वायसीएम हॉस्पिटलवरील ताण कमी होणार

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 1997 मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. चिखली, मोशी, चऱ्होली असा ‘रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ विकसित होत आहे. तसेच, पुणे जिल्ह्यातील खेड, चाकण, जुन्नर, आंबेगाव या भागातून वायसीएम रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी येतात. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्यस्थितीला 27 लाखांच्या घरात आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून चालवले जाणारे वायसीएम हॉस्पिटलवर ताण येतो. पार्किंग आणि वाहतुकीचीही समस्या आहे. आता मोशीत उभारण्यात येणाऱ्या 850 बेडच्या हॉस्पिटलमुळे वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी होणार असून, समाविष्ट गावांसह महापालिका हद्दीलगतच्या ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधा उपलब्ध होवून दिलासा मिळणार आहे.

पॅरामेडिकल कॉलेजच्या दृष्टीने नियोजन! – Moshi Hospital

मोशी येथील प्रशस्त जागेत तब्बल 850 बेडचे अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुरेशी जागा उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी पिंपरी-चिंचवड मेडिकल कॉलेज, पॅरामेडिकल कोर्सेस कॉलेज, नर्सिंग कॉलेज उभारण्याबाबत महापालिका प्रशासन सकारात्मक असून, त्यादृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. शहरासह उपनगर आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा  देण्याबाबत महेश लांडगे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत आहे.

Latest news
Related news