Moshi : शिळे अन्न दिल्यावरुन हॉटेल मालक आणि वेटरला मारहाण; सहाजणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – शिळे अन्न दिल्याच्या कारणावरुन सहाजणांनी मिळून हॉटेल मालक आणि वेटरला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 19) रात्री साडेनऊच्या सुमारास बीआरटी रोड, मोशी येथील ‘हंगरबर्ड’ या हॉटेलमध्ये घडली.

जयसिंग राघू आल्हाट (वय 54, रा. मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, लक्ष्मण दळवी (रा. मोशी) व त्याचे पाच साथीदार (नाव व पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आल्हाट यांचे बीआरटी रस्त्यावर ‘हंगरबर्ड’ नावाने हॉटेल आहे. रविवारी रात्री आरोपी जेवण करण्यासाठी त्यांच्या हॉटेलमध्ये आले. जेवताना अन्न शिळे असल्याच्या कारणावरुन आरोपींनी आपसात संगनमत करून वेटरला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी आल्हाट यांचा मुलगा अक्षय मध्यस्थी करण्यासाठी गेला असता आरोपींनी त्याला देखील लाथा बुक्क्यांनी, काठी आणि विटेने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये अक्षय जखमी झाला असून त्याच्यावर नजीकच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like