Moshi : दारू पिण्यास विरोध केल्यावरून पत्नीचा खून; पतीला अटक

एमपीसी न्यूज – दारू पिण्यासाठी विरोध करणा-या पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पत्नीचे प्रेत मोशी येथील एका डोंगरावर झाडीत टाकून दिले. ही घटना 17 ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

संतोष नेमुराम सप्रे (वय 32, रा. बाकी, सोनपुरी, जि. मुंगेली, छत्तीसगड) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. पिंकी संतोष सप्रे (वय 27) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष मूळ छत्तीसगड येथील असून कामाच्या निमित्ताने तो पुण्यात आला आहे. त्याला दारूचे व्यसन होते. संतोष याला दारू पिण्यासाठी पत्नी पिंकी विरोध करत असे. तसेच संतोष याला पिंकी आवडत नसे. या कारणावरून त्याने पिंकीला मोशी येथील शुभलक्ष्मी मार्बल अँड ग्रॅनाईट दुकानाच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरावर नेले. डोंगरावर तिचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी पत्नीचे प्रेत ओढत नेऊन डोंगरावरील झुडुपात टाकून दिले. याप्रकरणी 23 ऑक्टोबर रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणाचा तात्काळ तपास करत पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली व खुनाचा गुन्हा दाखल केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.