Moshi : बहिणीला त्रास देत असल्याने तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – बहिणीला वारंवार त्रास देत असल्याच्या कारणावरून तरुणाचा लोखंडी रॉडने खून केल्याची घटना आज (मंगळवारी) दुपारी तीनच्या सुमारास दिघी येथील मॅगझीन चौकात घडली.

विक्रम वाघमारे (वय सुमारे 25, रा. स्टॅन्ड रोड, मोशी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर संतोष चौधरी (रा. मोशी) असे आरोपीचे नाव आहे. दिघी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  • याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष याची मॅगझीन चौकात अजिंक्य हॉटेलजवळ पानटपरी आहे. मयत विक्रम हा संतोष याच्या बहिणीला मागील एक वर्षांपासून वारंवार त्रास देत होता. संतोष याच्या बहिणीने मयत विक्रम याला काही वेळेला समजून सांगण्याचा देखील प्रयत्न केला होता. मात्र, आरोपी तरीही तिला त्रास देत होता.

आज दुपारी तीनच्या सुमारास मयत विक्रम आरोपी संतोष याच्या टपरी समोर आला. त्यावेळी टपरीवर काही ग्राहक होते. विक्रम याने संतोष याला शिवीगाळ केली. त्यामुळे चिढलेल्या संतोष याने टपरी शेजारी पडलेल्या लोखंडी रॉडने संतोषला मारहाण केली. त्यात विक्रम याचा जागीच मृत्यू झाला. दिघी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपी संतोष याला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.