Moshi : मोशीत भरणार 11 डिसेंबरपासून भारतातील सर्वात मोठे ‘किसान’ कृषी प्रदर्शन

प्रदर्शनात सहाशेपेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज – भारतातील सर्वात मोठे ‘किसान’ कृषी प्रदर्शन 11 ते 15 डिसेंबर, 2019 दरम्यान मोशी येथे संपन्न होणार आहे. या प्रदर्शनात भारतातील सहाशेपेक्षा अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने सहभाग घेतला आहे. तसेच पुणे आकाशवाणी माध्यम सहयोगी आहे. इंडियन पोस्ट बँकेने देखील यामध्ये सहभाग घेतला आहे. अशी माहिती ‘किसान’ कृषि प्रदर्शनचे संयोजक निरंजन देशपांडे यांनी दिली.

पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र, मोशी येथे हे प्रदर्शन होणार असून दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. प्रदर्शनात चीन, तैवान, इस्राईल, युनायटेड किंग्डम आदी देशातील कंपन्या सहभाग घेणार आहेत. पाच दिवसीय प्रदर्शनामध्ये देशभरातून सुमारे दोन लाखापेक्षा अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज संयोजक निरंजन देशपांडे यांनी व्यक्त केला.

देशपांडे म्हणाले, “आधुनिक तंत्रज्ञान व कृषि क्षेत्रातील नवे विचार शेतक-यांपर्यंत पोहोचविणे हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषि निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव ऊर्जा, नर्सरी, शेती लघुउद्योग अशी विभागवार आठ दालने उभी करण्यात आली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉल शेतक-यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. पाण्याचे नियोजन व सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणा-या 100 पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण आहे.

प्रदर्शन प्रवेशासाठी नावनोंदणी शुल्क 100 रुपये ठेवण्यात आला आहे. पूर्वनोंदणीची सुविधा greenpass.com या संकेतस्थळावर व kisan.net या मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. पूर्वनोंदणी केल्यास प्रवेश शुल्कात 50 रुपये सवलत देण्यात आली आहे. प्रदर्शन स्थळी जाण्यासाठी पुण्याच्या शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमंगल बस स्टॉप पासून बसची मोफत सोय करण्यात आली आहे. किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी 020 30252020 किंवा www.kisan.in या संकेतस्थळावर संपर्क करावा, असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे.

ग्रीनपास रीडरद्वारे भेट देणा-या प्रत्येक शेतक-याला मिळणार डिजिटल ब्राऊशर

किसान कृषी प्रदर्शनात शेकडो स्टॉल लावण्यात येणार आहेत. तर या प्रदर्शनासाठी संपूर्ण देशभरातून दोन लाख पेक्षा अधिक शेतकरी भेट देण्याचा अंदाज आहे. त्यामुळे येणा-या प्रत्येक शेतकरी आणि नागरिकाला प्रत्येक स्टॉलचे माहितीपत्रक मिळणे आवश्यक आहे. कागदी माहितीपत्रके वाटण्यासाठी मोठ्या प्रमाणात कागदाची नासाडी होते. मोठ्या प्रमाणात कागद इतरत्र पडलेले पाहायला मिळतात. त्यामुळे प्रदर्शनाला पर्यावरणपूरक बनविण्यासाठी ग्रीनपास रीडर देण्यात येणार आहेत. प्रत्येक स्टॉलधारकाकडे क्युआर कोड असेल. या कोडला स्कॅन केल्यास संबंधित स्टॉल व कंपनीचे डिजिटल माहितीपत्रक मोबाईलवर तात्काळ उपलब्ध होईल, अशी सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर कागदी माहितीपत्रके देखील ठेवण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.