Moshi News: नागेश्वर महाराज यात्रेतील मानाचा विड्यासाठी तब्बल 91 लाखांची बोली

एमपीसी न्यूज – मोशीतील नागेश्वर महाराज मंदिरात उत्सवात वापरल्या गेलेल्या व महाराजांचरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव जवळजवळ लाखोंच्या आसपास गेला आहे. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या मानाची ओटी व मानाच्या विड्यासाठी लिलाव सुरू झाल्यानंतर मानाच्या ओटीच्या लिलावात ओंकार राजेंद्र आल्हाट यांनी 16 लाख पंचवीस हजार रुपये बोली लावून ओटी प्राप्त केली.

सर्वात शेवटी सर्वांचे लक्ष लागून असलेल्या शेवटच्या मानाच्या विड्याचा लिलाव सुरू झाल्यानंतर अनेकांनी श्वास रोखून धरला होता. शेवटचा मानाचा विडा गणेश तुकाराम कुदळे यांनी 91 लाख रुपये बोली लावून प्राप्त केला.

देवाच्या दारात पैशाला मोल नाही हेच खरं, याचा प्रत्यय करून देणारा हा लिलाव आहे. त्या लिलावात सुरुवातीपासून शेवटपर्यंत बसणाऱ्याला हे हमखास जाणवते.

‘नागेश्वर महाराजांच्या सानिध्यातील वस्तू, प्रसाद घेईल त्याला भरभराट’ या अशा शब्दात व भारदस्त आवाजात उत्सवातील लिलावात पुकार करण्याचे काम केदारी कुटुंबातील नारायण निवृत्ती केदारी, सागर नारायण केदारी हे करत आहेत.

केदारी यांचा यंदा ग्रामस्थांच्यावतीने उभा पोशाख, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. उत्सवातील वस्तूंचा लिलाव हा पंचक्रोशीतील भाविकांच्या दृष्टीने एक विशेष पर्वणीचा सण असतो. त्यामुळे लिलाव पाहण्यासाठी सभा मंडपामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

दरवर्षी या लिलावामध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा व भंडाऱ्यातील प्रसाद व इतर वस्तूंचा बोली लावून लिलाव केला जातो. ग्रामस्थांकडून भंडाऱ्यातील महाप्रसाद बनविण्याची भांडी दरवर्षी नव्याने खरेदी केली जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.