Moshi news: रस्त्यावर आढळले मेडिकल वेस्ट; हाॅस्पीटलकडून 25 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – चिखली- मोशी रस्त्यावर मेडिकल वेस्ट टाकणाऱ्या सिद्धीविनायक हाॅस्पीटलवर पंचवीस हजार रूपये दंडाची कारवाई क क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाच्या पथकाने आज, शनिवारी केली.

सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे, आरोग्य निरीक्षक विजय दवाळे व वैभव कांचनगौडार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

चिखली येथील कुदळवाडी येथे असणाऱ्या कचराकुंडीत दवाखान्यात वापरण्यात आलेले इंजेक्शन व वैद्यकीय घातक कचरा टाकण्यात आल्याचे आढळून आले. त्यामध्ये असणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे हा वैद्यकीय कचरा सिद्धीविनायक रूग्णालयाचा असल्याचे तपासणीत आढळून आले.

आकुर्डी रूग्णालयाच्या प्रमुख डाॅ. सुनिता साळवी यांनी प्रत्यक्ष कचरा कुंडीत टाकण्यात आलेल्या कचऱ्याची पाहणी केली. त्यानंतर मोशी रस्त्यावरील या रूग्णालयात जावून तपासणी केली असता त्यांच्याकडे महानगरपालिकेकडील वैद्यकिय कचऱ्याची परवानगी नसल्याचे आढळून आले.

सदर रूग्णालयाने रस्त्यावर कचरा टाकल्याने या रूग्णालयाचे प्रमुख डाॅ. परिक्षीत फेंगडे यांच्यावर पंचवीस हजार रूपये दंडाची कारवाई सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.