Moshi News : बास्केटबॉल मैदानाला मिळणार नवसंजीवनी

एमपीसी न्यूज – मोशी येथील प्राधिकरणाच्या जागेवर असलेल्या बास्केटबॉल मैदानाला आता नवसंजीवनी मिळणार आहे. महापालिका क्रीडा विभागाच्या वतीने या मैदानाच्या देखभाल दुरुस्तीबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून, लवकर कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याचे क्रीडा विभागाने सांगितले.

याबाबत आमदार महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी क्रीडा विभागाचे उपआयुक्त संदीप खोत यांची भेट घेतली. त्यावेळी खोत यांनी फाउंडेशनच्या गणेश लांडगे, सुरज लांडगे, मयूर लांडगे यांना मैदानाच्या देखभाल दुरुस्तीबाबत निविदा प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन दिले.

पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक नऊमध्ये अद्ययावत असे बास्केटबॉल मैदान उभारले आहे. यामुळे बास्केटबॉल प्रेमी, खेळाडू यांसह शहराच्या क्रीडा संस्कृतीला चालना मिळाली आहे. मात्र, दोन कोटी 97 लाख 50 हजार 652 रुपये खर्च करून उभारलेल्या मैदानाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून खेळण्यायोग्य राहिले नाही. यामुळे मैदानाची देखभाल दुरुस्ती करून ते खेळाडूंना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

या बास्केट बॉल मैदानामध्ये एकूण तीन बास्केट बॉल कोर्ट, एक सराव कोर्ट, प्रेक्षक गॅलरी याबरोबरच नागरिकांसाठी एक जॉगिंग ट्रॅकही आहे. त्याबरोबर एक प्रदर्शन सभागृह, एक पेडिकल खोली, स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, कार्यालय आदी सुविधा असलेले प्रशस्त क्लब हाऊस आहे.

दरम्यान, देखभाली अभावी मैदानाची दुरवस्था झाली आहे. महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे स्वयंसेवकांनी याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता बास्केटच्या तुटलेल्या जाळ्या, तडे गेलेले मॅट, जॉगिंग ट्रॅकवर साचलेले गवत, कचरा आणि प्लास्टिक बाटल्यांमुळे अस्वच्छता अशा एक ना अनेक बाबी निदर्शनास आल्या असल्याचे फाउंडेशनच्या निवेदनात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.