Moshi : शिक्षकाची नक्कल केल्याच्या संशयावरून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; महापालिकेच्या शाळेतील प्रकार

एमपीसी न्यूज – शिक्षकाची नक्कल केल्याचा संशय घेऊन एका शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. तसेच त्याला घरी न सोडता शाळेतच बसवून ठेवले. ही घटना बुधवारी (दि. 2) दुपारी पाचच्या सुमारास नूतन महानगरपालिका प्रशाला बो-हाडेवाडी, मोशी येथे घडली.

याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शाळेतील हिंदी विषयाचे शिक्षक कळसाईत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बो-हाडेवाडी मोशी येथे पिंपरी चिंचवड महापालिकेची नूतन महानगर प्रशाला ही शाळा आहे. या शाळेत फिर्यादी यांचा मुलगा शिकत आहे. हा विद्यार्थी सरांची नक्कल करतो असा गैरसमज झाल्याने शाळेतील हिंदी विषयाचे शिक्षक कळसाईत यांनी त्याला काठीने व हाताने पाठीत बेदम मारहाण केली. यामध्ये या विद्यार्थ्यांच्या पाठीला जखम झाली. शाळा सुटल्यानंतर देखील त्याला घरी जाऊ न देता शाळेतच थांबवून ठेवले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.