Moshi : तडीपार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कोणतीही परवानगी न घेता तो पुणे जिल्ह्यात आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल किसन कांडगे (वय 36, रा. चाकण मार्केटयार्ड जवळ, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस शिपाई गणेश सावंत यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल कांगडे याला 24 ऑगस्ट 2019 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. रविवारी (दि. 5) गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस कर्मचारी गणेश सावंत, प्रवीण पाटील आणि विजय मोरे भोसरी एमआयडीसी परिसरात गस्त घालून एमआयडीसी भोसरी ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत होते. त्यावेळी पोलिसांना माहिती मिळाली की, चाकण पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार एरोपी मोशी-आळंदी रोडवर महालक्ष्मी चौक येथे आला आहे. त्यानुसार, परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरोपी राहुल याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याला दोन वर्षांसाठी तडीपार केले असून तो कोणतीही परवानगी न घेता पुणे जिल्ह्याच्या हद्दीत आल्याचे निष्पन्न झाले. यावरून आरोपी राहुल याला अटक करून त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनिअम कायदा कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.