Moshi: नाला विकसित करण्यासाठी सव्वापाच कोटीचा खर्च!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी – च-होली प्रभागाअंतर्गत पुणे – नाशिक महामार्गाच्या पश्चिमेकडील नाला विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सव्वापाच कोटी रूपये खर्च होणार आहे.

मोशी – च-होली प्रभागाअंतर्गत मोशी येथे नाला आहे. पुणे – नाशिक महामार्गाच्या पश्चिमेकडील बाजूला भारतमाता चौकात हा नाला विकसित करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यासाठी 6 कोटी 23 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून 6 कोटी 9 लाख रूपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार, सात ठेकेदारांनी निविदा सादर केल्या.

त्यापैकी चैतन्य एंटरप्रायजेस या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 16.90 टक्के कमी दराने निविदा सादर केली. म्हणजेच 5 कोटी 6 लाख रूपये अधिक रॉयल्टी चार्जेस 4 लाख 4 हजार आणि मटेरीयल टेस्टींग चार्जेसपोटी 9 लाख 92 हजार रूपये असे एकूण 5 कोटी 20 लाख रूपये खर्च होणार आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 10 जानेवारी 2020 रोजी या कामांची निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. दीड वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.