Moshi : घराचा कडीकोयंडा तोडून दीड लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण दीड लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 29) सकाळी साडेसातच्या सुमारास गंधर्वनगरी मोशी येथे उघडकीस आली.

तुकाराम भिकाजी गव्हाणे (वय 36 रा. गंधर्वनगरी मोशी) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम मोशी येथील गंधर्वनगरीमध्ये गणेश मंदिर कॉलनीत राहतात. उन्हाळा सुरू असल्याने ते घराच्या छतावर झोपतात. मंगळवारी रात्री तुकाराम यांचे कुटुंब घराच्या गच्चीवर झोपले.

दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून एक लाख 27 हजार 600 रुपयांची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने असा एकूण 1 लाख 65 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

  • बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास तुकाराम घराच्या छतावरून खाली आले असता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.