Moshi: पर्यावरण दिनानिमित्त मोशीत रंगला चिंच आणि वटवृक्षाचा अनोखा विवाहसोहळा!

एमपीसी न्यूज- सध्या सगळीकडे लग्न समारंभाचा सिझन सुरु आहे. मोठ्या धुमधडाक्यात विवाह सोहळे होत आहेत. मोशीत आज (बुधवारी) असाच एक अनोखा विवाहसोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. जागतिक पर्यावरण दिनाच्या मुहूर्तावर चिंच आणि वडाचा एक आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. यातून वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.

उन्हाची तीव्रता, वाढते तापमान, झाडांची गरज पावसाचे घटत चाललेले प्रमाण अशा परिस्थितीत झाड लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजे हा उद्देश ठेवून भूगोल फाउंडेशन, संतनगर मित्रमंडळ, मोशी, संतनगर महिला मंडळ, संतनगर ज्येष्ठ नागरिक संघ, भक्तीशक्ती संगम, संतनगर सामाजिक मंच, इंद्रायणी सेवा संघ, आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

  • संतनगर दसरा चौक, सेक्टर 4, मोशी प्राधिकरण येथे आज हा विवाहसोहळा रंगला. लग्नात जशी परण्याची मिरवणूक काढतात. त्याचप्रमाणे वडाची मिरवणूक देखील काढण्यात आली. वधू असलेल्या ‘चिंच’च्या जाई, जुई, चंपा, चमेली, शेवंती, गुलछडी, बिजली करवल्या होत्या. वधू-वराच्या मामाची भूमिका सुरेश साळुंके आणि प्रवीण तुपे यांनी वठविली. सात मंगल अष्टीका घेत अतिशय पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला.

या अनोख्या विवाह सोहळ्याला महापौर राहुल जाधव, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर मोहिनी लांडे, नगरसेवक संजय वाबळे, विक्रांत लांडे, विजय लोखंडे, माजी प्रभाग सदस्य संजय आहेर, महापालिकेचे उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, कामगार नेते सचिन लांडगे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, रोहित खर्गे, अनिल कातळे, लायन्स क्लबच्या गौरी गद्रे, प्रा. दिगंबर ढोकले उपस्थित होते. रोपटे देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. निसर्गमित्राची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • महापौर जाधव म्हणाले, ”या चिंच आणि वडाच्या अनोख्या विवाह सोहळ्यातून वृक्ष संवर्धन होणार आहे. याच्या माध्यमातून जनमानसात चांगला संदेश जाईल. भविष्यात देशावर येणाऱ्या संकटातून वृक्ष लागवड केल्याने सुटका होणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन करणे, त्याचे संगोपन करणे काळाची गरज आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना महापालिका सर्वतोपरी सहकार्य करण्याचे” आश्वासनही त्यांनी दिले.

विलास लांडे म्हणाले, ”ग्लोबल वॉर्मिग वाढत आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यासाठी वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. भोसरीत अशा कार्यक्रमाची आवश्यकता असून असे कार्यक्रम सातत्याने होणे गरजेचे आहे”.

  • भूगोल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, विवाह सोहळ्याचे संयोजक विठ्ठल वाळुंज म्हणाले, ”पर्यावरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी. यासाठी या अनोख्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. राज्यात पहिल्यांदाच वृक्षांचा विवाह सोहळा होत आहे. पिंपरी-चिंचवड शहर हरित झाले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी वृक्ष संवर्धनासाठी काम करण्याचे” आवाहनही त्यांनी केले.

‘झाडांना नका करु नष्ट, नाहीतर श्वास घ्यायला होतील कष्ट, पृथ्वीवर माणुसच एक असा प्राणी आहे. जो झाडे लावू शकतो. बचत पाण्याची गरज काळाची, स्वच्छता म्हणजे रोजचा सण नाहीतर कायमचे आजारपण, सफाई करा रोज, घाणीचा प्रॉब्लेम क्लोज’ असा संदेश यावेळी देण्यात आला. त्याचबरोबर झाडांना पाणी घालू, विजेचा काटकसरीने वापर करू, ओला-सुका कचरा वेगळा ठेवू, थर्माकोलचा वापर बंद करू, प्लास्टिकला प्रतिबंध करू, झाडे लावू झाडे जगवू, जवळचा प्रवास पायी करु, सायकलचा वापर करू असे अनेक पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. केक कापून झाडांचा वाढदिवस साजरा केला.

  • आहेर म्हणून स्वीकारली रोपे अन्‌ कुदळ, फावडे, खत!
    चिंच आणि वटवृक्षाच्या विवाह सोहळ्यात आहेर देखील स्वीकारण्यात आला. पण, तो रोपांचा, आयुर्वेदिक वृक्ष, देशीवृक्ष, कुदळ, फावडे, टिकाव, पहार, घमेले, खुरपे, बकेट, झाडांचे खत आहेर म्हणून स्वीकारण्यात आले. भूगोल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल वाळुंज यांच्या संकल्पनेतून हा अनोखा विवाह सोहळा पार पडला.

ग्लोबल वॉर्मिगची लागली चाहूल!
प्रदुषण करण्याची करु नका भूल!
धरणीमातेवर पसरवू वनराईची झुल!
वसुंधरेच्या चरणी वाहतो प्रयत्नांचे फुल!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.