Moshi : ट्रक-कारचा अपघात; दोघांचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडत असलेल्या कारला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली. यामध्ये कारमधून जाणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि. 16) रात्री साडे अकराच्या सुमारास पुणे-नाशिक रोडवर मोशी येथे जुना जकात नाक्याजवळ झाला.

रघुवीर बाबुराव भावसार, मोहन भागान्ना माळवदकर अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर प्रल्हाद आंगळे, आनंद भावसार हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी आर जे 19 / जी जी 1147 या ट्रक वरील चालकाचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आणि जखमी एम एच 14 / एफ एस 92 54 या कारमधून जात होते. ते मोशी जवळ जुना जकात नाका येथे बोर्‍हाडेवाडीकडे जाण्यासाठी नाशिक रोड क्रॉस करत होते. त्यावेळी पुणे-नाशिक महामार्गावरून एक ट्रक भरधाव वेगात आला. त्या ट्रकने रस्ता ओलांडत असलेल्या कारला जोरदार धडक दिली.

यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात घडल्यानंतर आरोपी ट्रकचालक घटनेची माहिती न देता पळून गेला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.