Moshi: सफारी पार्कचे नवे गाजर – उत्तम आल्हाट

प्रत्येक प्रकल्पात भागीदारी करून जनतेला आणखी किती लुटणार आहात ?

एमपीसी न्यूज – मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा सफारी पार्क उभारण्याची घोषणा सत्ताधाऱ्यांनी केली आहे. हे कोट्यवधी रुपये लाटण्याचे आणखी एक नवे चराऊ कुरण आहे. मोशीतील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात भागीदारी करून भोसरी मतदारसंघातील करदात्या नागरिकांचे कोट्यवधी रुपये लाटण्यात येणार आहेत. ते कमी पडले म्हणून की काय आता सिंगापूर येथील सेन्टोसा पार्क या गोंडस नावाखाली मोशीत सफारी पार्क उभारून रोजगार देण्याचे नवे गाजर या मतदारसंघातील तरूणांना दाखविले जात आहे. प्रत्यक्षात या सफारी पार्कच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये लुबाडण्याचा डाव आखण्यात आला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तम आल्हाट यांनी भाजपवर केला आहे.

यासंदर्भात उत्तम आल्हाट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “निवडणुकीमुळे भोसरी मतदारसंघात आम्ही हा प्रकल्प राबविला, तो प्रकल्प साकारला, असे जनतेला दररोज खोटे सांगितले जाते आहे. असे खोटे सांगणारे कोण आहेत? हे जनतेला माहिती आहे. परंतु, जनता पुढे येऊन विचारणार नाही याची जाणीव असणारे भोसरी मतदारसंघातील सत्ताधारी मतदारसंघातील नागरिकांना दररोज एक गाजर दाखविण्याचे काम करत आहेत. रोज खोटे बोलले की मतदारसंघातील जनता आम्हाला भरभरून मतदान करेल, असा या सत्ताधाऱ्यांचा समज झाला आहे. हा सर्व खोटा प्रचार मतदारसंघातील नागरिकांना गृहित धरून पेरला जात आहे. मात्र मतदारसंघातील जनता निवडणुकीत अशा खोट्या प्रचाराला निश्चितच बळी पडणार नाहीत. नागरिकांसाठी म्हणायचे आणि प्रत्येक प्रकल्पात भागीदारी करून स्वतःचे घर भरायचे. अरे, असे आणखी किती प्रकल्प फक्त स्वतःच्या फायद्यासाठी राबवून जनतेची लूट करणार आहात?” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तम आल्हाट यांनी सत्ताधारी भाजपला विचारला आहे.

सत्ताधारी मोशीतील कचरा डेपोमध्ये वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प राबविला असल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात या प्रकल्पात कोणाची भागिदारी आणि आणि त्यातून कोण किती मलिदा लाटणार आहे, हे मतदारसंघातील सर्व जनतेला समजले आहे. या प्रकल्पासाठी महापालिका स्वतःची जागा फुकटात देऊन वरून ठेकेदाराला कोट्यवधी रुपये मोजणार आहे. म्हणजे जागा पण फुकटची मिळाली आणि पैसे पण मिळाले, असा हा साधा व्यवहार आहे.

हा प्रकल्प पद्धतशीरपणे कट रचून मंजूर करण्यात आला आहे. कारण या प्रकल्पात सत्ताधाऱ्यांची भागीदारी आहे. याचाच अर्थ हा प्रकल्प जनहितासाठी नव्हे तर स्वःहितासाठी राबविण्यात येत आहे, हे स्पष्ट होते. कोट्यवधी रुपये खाऊन वरून हा प्रकल्प नागरिकांच्या हिताचा असल्याचे सोशल मीडियावरून भासविले जात आहे.

वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील भागीदारीमधून मिळालेले कोट्यवधी रुपये कमी पडले की काय म्हणून आता सफारी पार्कच्या प्रकल्पातून शेकडो कोटी लाटण्याचा डाव रचण्यात येत आहे. हा प्रकल्प दीड हजार कोटींचा म्हणून सांगितले जात आहे. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात एकही मोठा प्रकल्प राबवून बेरोजगारांना रोजगार देता आला नाही. दहशत, गुंडगिरी आणि खंडणीखोरी वाढल्यामुळे मतदारसंघातील अनेक लहान-मोठ्या कंपन्या स्थलांतर करण्याच्या मासिकतेत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी मतदारसंघात सुरक्षित वातावरण तयार करण्याचे सोडून आता निवडणुकीच्या प्रचारात सफारी पार्कमुळे नागरिकांना रोजगार मिळणार असल्याचे नवीन गाजर दाखविले जात आहे.

प्रत्यक्षात नागरिकांना आशेवर बसवून सफारी पार्क प्रकल्पात सुद्धा भागीदारी करून आपले कोट्यवधींचे हित साधण्याचा डाव आहे. मतदारसंघातील नागरिकांनी हा डाव वेळीच ओळखून विधानसभा निवडणुकीत तो हाणून पाडावा. स्वहितापेक्षा मतदारसंघाचे हित पाहणारे माजी आमदार विलास लांडे यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन उत्तम आल्हाट यांनी केले आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.