सोमवार, डिसेंबर 5, 2022

Municipal Corporation : महापालिकेकडून विकले जाणारे बहुतांश राष्ट्रध्वज चुकीच्या पद्धतीने झालेत प्रिंट

 एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर राबविण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा उपक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने नागरिकांना विकले जाणारे बहुतांश राष्ट्रध्वज चुकीच्या पद्धतीने प्रिंट झाले आहेत. राष्ट्रध्वज नियमानुसार साईजमध्ये नाहीत, चुरगळलेले आहेत.त्यामुळे वाटप झालेले चुकीचे राष्ट्रध्वज तातडीने परत घेऊन नवीन राष्ट्रध्वज देण्याची मागणी केली जात आहे.

 

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात प्रत्येक नागरिकांच्या घरांवर तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय आस्थापना, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करण्यासाठी जाणीव जागृती कार्यक्रमाचे नियोजन महापालिकेच्यावतीने केले आहे.

 

महापालिका आठ क्षेत्रीय कार्यालयातून नागरिकांना राष्ट्रध्वजाची विक्री करत आहे.एका राष्ट्रध्वजाची किंमत 24 रुपये आहे. परंतु, महापालिकेकडून विक्री केलेले बहुतांश राष्ट्रध्वज चुकीच्या पद्धतीने प्रिंट झाले आहेत.नियमानुसार अशोक चक्र हे राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असले पाहिजे. पण, विक्री झालेल्या अनेक राष्ट्रध्वज मध्यभागी अशोकचक्र दिसत नाही. राष्ट्रध्वज साईज कमी जास्त आहे. काही राष्ट्रध्वज चुरगळलेले आहेत. त्यामुळे असे राष्ट्रध्वज महापालिकेने परत घ्यावेत आणि नवीन राष्ट्रध्वज द्यावेत, अशी मागणी केली जात आहे.

 

 

 

 

पूर्णानगर येथील आकाश माने म्हणाले, ”हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत महापालिकेकडून वाटप होत असलेले बहुतांश राष्ट्रध्वज  हे चुकीच्या पद्धतीने प्रिंट झाले आहेत.काही राष्ट्रध्वज चुरगळलेले आहेत.नियमानुसार कुठल्याही राष्ट्रध्वज अशोकचक्र मधोमध नाही. अशा प्रकारचे राष्ट्रध्वज वाटप करणे अत्यंत चुकीचे आहे. याची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. नियमानुसार नसलेले राष्ट्रध्वज परत घ्यावेत आणि नागरिकांना नवीन राष्ट्रध्वज द्यावा”.

 

महापालिकेचे उपायुक्त मनोज लोणकर म्हणाले, ”महापालिकेला राष्ट्रध्वज मिळत नसल्याने राज्य शासनाने काही राष्ट्रध्वज उपलब्ध करुन दिले आहेत. ते राष्ट्रध्वज नागरिकांना विक्री केले जात आहेत.नियमानुसार नसलेले, चुरगळलेल्या राष्ट्रध्वजाची विक्री करु नये अशा सूचना दिल्या आहेत.चुरगळलेले राष्ट्रध्वज बाजूला ठेवावेत, ते परत शासनाकडे दिले जाणार आहेत. ज्या नागरिकांना चुरगळलेले, नियमानुसार प्रिंट झाले नसलेले राष्ट्रध्वज मिळाले आहेत. त्यांनी ते राष्ट्रध्वज महापालिकेकडे परत करावेत. त्यांना नवीन राष्ट्रध्वज देण्यात येणार आहे”.

 

Latest news
Related news