Talegaon Dabhade News : आई खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षतेचे गाव असते – उत्तम कांबळे

आरएमके ग्रुप तर्फे संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – आईचे सामर्थ्य समजावून घेणे अतिशय कठीण असून, आईच्या प्रेमातून उलगडणारे अनेक पैलू जाणून घेताना दमछाक होते. आई ही फक्त आकृती नसते, तर ती प्रकृती असते. प्रत्येक क्षणी आई नव्याने उलगडत जाते. एका अर्थाने आई हे धर्मनिरपेक्षतेचे गाव असते. आई नावाची व्यक्ती नसते, तर ती मूल्य असते. त्यामुळे आईला वस्तू समजणार्‍या समाजाचा र्‍हास निश्‍चित आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले.

तळेगाव दाभाडे येथील आरएमके ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवात ‘आई समजून घेताना’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ज्येष्ठ साहित्यिक कांबळे यांनी विचार व्यक्त केले.

यावेळी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष व उद्योजक रामदास काकडे, उद्योजक किशोर आवारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, उद्योजक नंदकुमार शेलार, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, माजी नगरसेवक रवींद्र आवारे, भाजपा मावळ तालुका युवक अध्यक्ष संदीप काकडे, माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, मासाहेब दाभाडे सरकार, ॲड रंजना भोसले, उद्योजक युवराज काकडे, माजी नगरसेवक सुनील कारंडे, उद्योजक रणजित काकडे आदी उपस्थित होते.

आई विषयी जाणून घेण्याची उत्कंठा अधिक दाटली. आई या नात्याच्या संदर्भात अनेक गोष्टी वाचू लागलो. वाचनातून आई समजू लागली. भाकरीच्या पाठीमागे धावताना आई समजून घेण्यास वेळ मिळेनासा झाला. कारण, आई या नात्याचे रोज नवे पैलू समोर येत गेले. आयुष्याची पन्नास वर्षे आई समजावून घेण्यात गेली. प्रत्येक आई हे वेगळेच रसायन असते. या नात्याच्या शोधास अखेर नाही.

आई या नात्याला बंधन अन् सीमा नाहीत. आईच्या तत्वज्ञानावर विश्‍वास ठेवून मार्गक्रमण केल्यास यश नक्की मिळते. आईचा उपदेश हाच आयुष्याचा टर्निंग पॉईंट होतो. आई ही हट्टी असते. लेकरांच्या आयुष्यासाठी ती कितीही कष्ट करायला तयार असते. तिच्या मातृत्वाच्या भूकेला अंत नसतो.  त्यामुळे पाल्य म्हणून आईचं प्रेम आणि वात्सल्य समजावून घेता येत नाही. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.

दरम्यान, इंद्रायणी महाविद्यालयाच्या हर्षदा गरुड या विद्यार्थीनीने आंतरराष्ट्रीय ज्युनिअर चँपियनशिपमध्ये मिळविलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल आरएमके ग्रुपच्या वतीने हर्षदाचे आई-वडील, प्रशिक्षक बिहारीलाल दुबे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक विजेता चिराग वाघवले, रौप्यपदक विजेता महेश आसवले, छत्रपती पुरस्कार विजेते नितीन म्हाळस्कर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उद्योजक रणजीत काकडे यांनी, तर आभार गणेश काकडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.