Bhosari : पोटच्या तीन मुलांना गळफास देऊन महिलेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पोटच्या तीन मुलांना गळफास लावला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (रविवारी) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली आहे.

फातिमा अक्रम बागवान (वय 28), मुलगी अलफिया अक्रम बागवान (वय 9), झोया अक्रम बागवान (वय 7), मुलगा जिआन अक्रम बागवान (वय 6) अशी मृतांची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामाच्या शोधात भोसरीमध्ये आलेल्या कामगार कुटुंबातील पत्नीने स्वतःच्या तीन मुलांना गळफास लावून स्वतः आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. फातिमा यांचा परिवार मूळचा कर्नाटकमधील उमरगा येथील आहे. चार दिवसांपूर्वी कामाच्या शोधात बागवान कुटुंबाने भोसरी गाठली होती. अक्रम बागवान फळ विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. यापूर्वी हे कुटुंब तळेगाव दाभाडे येथे वास्तव्य करत होते. तिथून मागील चार दिवसांपूर्वी भोसरी मधील नूरमोहल्ला, न्यू प्रियदर्शनी शाळेशेजारी ते राहण्यास आले.

फातिमा यांनी पती अक्रम यांना काम शोधण्यासाठी आज सकाळी साडेदहाच्या सुमारास घराबाहेर लावले. त्यानंतर त्यांनी घरातील छताच्या हुकाला तिन्ही मुलांना नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावला. त्यानंतर फातिमा यांनी दुस-या खोलीत जाऊन ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. चारच्या सुमारास अक्रम घरी आले. त्यावेळी घर आतून बंद होते. त्यांनी बराच वेळ दार वाजवले मात्र दार कुणीही उघडले नाही. त्यांनी पोलिसांना बोलावून आणले. पोलिसांनी दार तोडून घरात प्रवेश केला असता चौघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले.

मुलगी अलफिया चौथीत, झोया दुसरीत आणि मुलगा जिआन पाहिलीत शिकत होते. फातिमा यांनी मुलांना मारून स्वतः आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिट्ठी लिहून ठेवली नाही. पोलिसांनी संपूर्ण घराची तपासणी केली असून त्यामध्ये पोलिसांना कोणतीही संशयास्पद काहीही मिळाले नाही. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.