Pune News : विक्रीसाठी आणलेले पहाडी पोपट आणि 126 लव्हबर्डची सुटका, एकाला अटक

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने एका व्यक्तीच्या ताब्यातून तीन पहाडी पोपट 126 लव्हबर्डची सुटका केली. हे सर्व पक्षी त्याने बेकायदेशीर रित्या विक्री करण्यासाठी आणले असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. रहेमतुल्ला शौकतउल्ला खान (वय 57, रा. पेंशनवाला मशीदीसमोर, रास्ता पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वनसंरक्षक काळुराम कड यांनी तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मागील दोन वर्षापासून पक्षी विक्री करण्याचा व्यवसाय करत होता. परंतु हे करत असताना त्याने आवश्यक त्या परवानग्या मात्र काढल्या नव्हत्या. परवानगी न घेता विक्री किंवा त्यांचे पालन-पोषण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाते. तसेच पहाडी पोपट हे पाळण्यास बंदी असून, ते बेकायदेशीर आहे. यादरम्यान, खान हा तीन पहाडी पोपट तसेच लब्हबर्ड पिंजऱ्यात कोंडून निर्दयीपणे वागवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक संजय गायकवाड व त्यांच्या पथकाने छापा कारवाई केली. त्यावेळी खान यांच्या रास्ता पेठेतील एका इमारतीच्या टेरेसवर हे पोपट व लव्हबर्ड दिसून आले. पोलीसांनी वनविभागाच्या मदतीने या पक्षांची सुटका केली. येथून पहाडी पोपटसोबतच पिंजऱ्यात बजरी जातीचे 126 लव्हबर्ड मिळाले असून, ते घेऊन सुरक्षेसाठी वाईल्ड लाईफ टीटीएस या रेस्क्यु संस्थेत देण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.