Pimpri : ‘पाणी चोर पाणी चोर भाजप सरकार, पाणी चोर’ (व्हिडीआे)

विस्कळीत पाणीपुरवठ्यावरुन राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेचे  महापालिकेसमोर आंदोलन 

एमपीसी न्यूज – ‘भाजप सरकार पाणी चोर’, ‘भाजपचे करायचे काय खाली डोके वर पाय’, ‘महापौर पाणी द्या, पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा’, ‘पाणी चोर पाणी चोर भाजप सरकार, पाणी चोर’, ‘चोर भाजपच्या उलट्या बोंबा’, ‘दारू मिळणार घरपोच मात्र पाणी मिळणार नाही’ अशा जोरदार घोषणा देत पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेच्या वतीने आज (शनिवारी)महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.

महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा दुपारी दोन वाजता होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर विरोधकांनी विस्कळीत पाणीपुरवठ्यावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक मयुर कलाटे, नाना काटे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संजय वाबळे, समीर मासूळकर, विनोद नढे, राहुल भोसले, विक्रांत लांडे, संतोष कोकणे, राजू बनसोडे, नगरसेविका वैशाली काळभोर, अपर्णा डोके, सुलक्षणा धर, संगीता ताम्हाणे, विनया तापकीर, उषा काळे, सुमन पवळे, माई काटे, अनुराधा गोफणे, पोर्णिमा सोनवणे, निकिता कदम, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, सुलभा उबाळे, नगरसेविका मीनल यादव, रेखा दर्शीले, अश्विनी वाघमारे, मनसेचे सचिन चिखले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.

 दरम्यान, पिंपरी -चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. पवना धरणातून महापालिका दररोज 480 ते 500 एमएलडी पाण्याचा उपसा करते. तरीही, पावसाळ्यात शहरातील सर्वच भागात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत  आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. विरोधकांसह सत्ताधारी देखील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरुन वैतागले आहेत. वारंवार बैठका घेऊन देखील फलनिष्पती शून्य आहे. चार दिवसात, आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा, असे सत्ताधा-यांनी इशारे देऊन देखील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.