Movie Review: पावनखिंड, एका अलौकिक पराक्रमाची रोमहर्षक कहाणी !

एमपीसी न्यूज (हर्षल आल्पे) : नुकताच एका चित्रपटाला जाण्याचा योग आला, पावनखिंड !!!!! खरं तर हा चित्रपट नाहीच आहे , तर हा जाज्वल्य इतिहास आहे, जो प्रत्येकाने पाहायला हवाच, आपल्या मागच्या पिढ्यांनी स्वातंत्र्यासाठी, सुराज्यासाठी काय काय केले, आणि जीवनातील आदर्श मूल्य कशी जपली, त्यासाठी कसा अलौकिक त्याग केला, याचे मूर्तीमंत दर्शन या चित्रपटातून घडते .

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, त्यांचा पराक्रम हा सर्वार्थाने आदर्शवत तर आहेच, पण तो जीवनाच्या विविध अंगांनी आपल्याला खूप काही शिकवणारा आहे आणि म्हणूनच आजही जगभरातल्या जवळजवळ सर्वच विद्यापीठांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर फार सखोल अभ्यास होत आहे. त्यांचे नेतृत्वगुण, त्यांची युद्धनीती, त्यांचा रयतेबद्दल चा दृष्टिकोन, ममत्व हे सगळेच विषय फार खोलात शिरून अभ्यासले जातात. सैनिकी शिक्षणात ही छत्रपतींची युद्धनीती ही विशेषत्वाने शिकविली जाते .

तुमचे नियोजन जर योग्यरीतीने अमलात आणले जात असेल तर कुठली ही गोष्ट अशक्यप्राय राहत नाही, योग्य इच्छाशक्ती असेल तर कुठलाही भीष्म पराक्रम अगदी लीलया आपण पार करतो. हाच महाराजांनी आदर्श घालून दिला आहे. आणि याचे पाइक होण्याची जवाबदारी आपली आहे.

तर पावनखिंड हा अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर व भाऊसाहेब आरेकर निर्मित तर दिग्पाल लांजेकर लिखित- दिग्दर्शित चित्रपट पाहात असताना पदोपदी असे वाटत होते , की हा चित्रपट , हा जीवंत इतिहास येणार्‍या पुढच्या पिढ्यांनी पाहायलाच हवा. आज जे काही समाजकंटकांकडून आपल्या इतिहासाचे विद्रूपिकरण होत आहे , त्यांना हा चित्रपट म्हणजे दिले गेलेले सणसणीत उत्तर आहे . आपल्या महापुरुषांना जातीजातीत विभाजित करू पाहाणार्‍यांनी तर जरूर हा चित्रपट पाहावा . असलेली स्वामिनिष्ठा , एका महान ध्येयाने प्रेरित होऊन करत असलेल्या त्यागाचे चित्रण या चित्रपटात अगदी रोमहर्षकपणे केलेले आहे , या बद्दल पावनखिंड या चित्रपटाच्या संपूर्ण समूहाचे विशेष कौतुक च केले पाहिजे . यात काम करणार्‍या प्रत्येक कलाकाराने आणि सहकार्याने अक्षरश: जीव ओतून काम केल्याचे जाणवते . काही क्षण यातला प्रत्येक कलाकार हा महाराजांचा शिलेदार च भासतो , नुसते तेच नाही तर प्रत्येक जण तो काळ जगला आहे . चित्रपट संपल्यावर आपण कदाचित यातल्या कलाकारांची नावे विसरून जाऊ , पण ती ती पात्र म्हणून नव्हे तर ते स्वराज्याचे राखणदार , खरे योद्धे म्हणून च आपल्या डोळ्यासमोर येतात.

खरतर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यावर चित्रपट करणे हे एक शिवधनुष्य च असते . एखादी चूक ही आपण केलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टींवर पाणी फिरवू शकते , लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि त्यांच्या संपूर्ण संचाने हे शिवधनुष्य तिसर्‍यांदा लीलया पेललय , आधी फर्जन्द , मग फत्तेशिकस्त आणि आता पावनखिंड ! खरतर यातून या संपूर्ण संचाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत ची एक विलक्षण तळमळ आपल्याला पदोपदी जाणवते . त्यामुळे जर एखादी तांत्रिक चूक ही असेलही तरी आपण त्या इतिहासात असल्याने, आपल्या लक्षात ही येत नाही, अर्थात पावनखिंड हा चित्रपट तांत्रिक बाबतीत खूप निर्दोष पद्धतीने बनविण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपल्याला कळते की, या चित्रपटाचे संकलक प्रमोद कहार यांनी आजारपणात असून ही हा चित्रपट जिद्दीने आणि महाराजांच्या प्रेरणेने पूर्ण केला, हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. संकलनाच्या बाबतीत हा चित्रपट कुठे ही कमी नाही. त्यांनी आपले काम चोख बजावले होते. हेच चित्रपट बघितल्यावर जाणवते.

सर्वच कलाकारांच्या भूमिका यातल्या अत्यंत कमाल झाल्या आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे अभिनेता अजय पूरकर यांनी साकारलेली वीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका त्यांनी अत्यंत जीवंतपणे साकारलेली आहे. विशेषत: त्यांनी वापरलेली देहयष्टी आणि केलेला डोळ्यांचा आणि आवाजाचा संयत वापर याने “वीर बाजीप्रभू देशपांडे, हे असेच असतील” या अतिउच्च पातळीवर नेऊन ठेवली आहे. विशेषतः “बाजूला व्हा” या आरोळीने तर आपल्या रोमारोमात रोमांच उभे राहतात. तसेच जिजामाता यांच्या वात्सल्याने भारलेल्या लढाऊ भूमिकेत अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी यांनी अत्यंत सुंदर असे काम केले आहे. त्यांच्या डोळ्यात या सर्व भाव भावनांचे सार आपल्याला दिसते. आणि अशी खात्रीच पटते की, मासाहेब जिजाबाई या अशाच असतील. अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अतिशय कसदार पद्धतीने साकारलेली आहे. विशेषता: एका प्रसंगात जिथे नरवीर शिवा काशीद याला महाराजांचे कपडे परिधान करून एका दुसर्‍या मार्गाने पाठविले जात असते आणि दोन पालख्या ज्यात एका पालखीत महाराज स्वतः आणि दुसर्‍या पालखीत शिवा काशीद महाराजांच्या वेशात बसून दोन्ही पालख्या वेगवेगळ्या मार्गाला जात असतात तेव्हा त्या प्रसंगात छ्त्रपती शिवाजी महाराजांची आपल्या साथीदाराबद्दलची तळमळ, शिलेदाराबद्दलचे प्रेम आणि तो करत असलेला त्याग चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या संपूर्ण देहयष्टीतून फारच सुंदर दाखविले आहे. या चित्रपटात असे अनेक प्रसंग आहेत की, जिथे अशा पद्धतीने कलाकारांच्या अभिनयाचा कस लागलेला आहे. सयंतपणाचा समतोल प्रत्येकानेच सांभाळला आहे . क्षिती जोग यांनी साकारलेली बडी बेगम हिच्या नजरेतली क्रूरता आपल्याला जाणवते . तसेच समीर धर्माधिकारी यांनी सिद्धी जोहर उत्तम साकारलेला आहे . आस्ताद काळे यांनी सिद्धी मसूदची भूमिका वेगळ्याच पद्धतीने साकारलेली आहे. वैभव मांगले यांनी साकारलेली गंगाधरपंतांची भूमिका त्यांच्या विशिष्ट शैलीमुळे मजा आणते.

अमोल गोळे आणि प्रियांका मयेकर यांनी हा चित्रपट चांगल्या पद्धतीने, दिव्यांचा योग्य वापर करत चित्रित केला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे चित्रपटाचा आवाज म्हणजेच साऊंड प्रणव अभ्यंकर, हिमांशु आंबेकर, अजिंक्य ढापरे , पार्थ गोंधळेकर, निखिल लांजेकर, योगेश नेहे, आकाश सेनगुप्ता यांनी उत्तम सांभाळला आहे. देवदत्त बाजी यांनी संगीतही उत्तम दिले आहे. चित्रपटातील गाणी तशी श्रवणीय आहेत.

चित्रपटात काही ठिकाणी संवाद थोडे कमी असते तरी चालले असते. तरी एकूणच पावनखिंड हा चित्रपट हा एक अनुभव आहे, इतिहासातील भीम पराक्रमाचे साक्षीदार होऊन आपली मूल्ये तपासण्याची ही एक संधी आहे, त्यासाठी तरी पावनखिंड हा चित्रपट प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच हवा … एवढे निश्चित!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.