Pimpri : खासदार बारणे यांनी लोकांच्या निवडीचे ख-या अर्थाने सार्थक केले – छत्रपती संभाजीराजे भोसले

खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण

एमपीसी न्यूज – जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी बारणे लोकसभेच्या सभापतींना देखील भांडत असतात. अशी तळमळ खूप कमी लोकप्रतिनिधींमध्ये आहे. लोकांच्या निवडीचे खऱ्या अर्थाने त्यांनी सार्थक केले आहे, असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार बारणे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. तसेच विविध पुरस्कारांचे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, जिल्हा महिला संघटिका शादान चौधरी, शहरप्रमुख योगेश बाबर, संपर्क प्रमुख गणेश जाधव, शहर महिला संघटिका उर्मिला काळभोर, मावळ तालुका प्रमुख राजू खांडभोर, शैला खंडागळे, प्रमोद कुटे, सरिता साने, अनंत को-हाळे, अनिता तुतारे, जितेंद्र ननावरे, विश्वजित बारणे, अभिजित गोफण, प्रतीक्षा घुले, खासदार श्रीरंग अप्पा बारणे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन चिंचवडे, उपाध्यक्ष बशीर सुतार, कार्याध्यक्ष धनाजी बारणे, सचिव रवी नामदे आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणाले, “माझा सन्मान हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आहे. जो सामान्य माणूस असामान्य कर्तृत्व करतो, त्याची वाटचाल शिवाजी महाराज, शाहू महाराजांच्या विचारांवर आधारित असते. खासदार श्रीरंग बारणे यांची प्रश्न मांडणे आणि ते सोडविण्याची जिद्द मोठी आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यसभेत मी आणि लोकसभेत बारणे यांनी आवाज उठवला. किल्ले संवर्धनासाठी निधी मिळावा यासाठी माझ्याआधी बारणे यांनी संसदेत निधीची मागणी केली. समोरचा माणूस निवडून आला असता तर सामान्य माणसाचा पराजय झाला असता. पण सामान्य माणसाचा पराजय कधीच होणार नाही. बारणे यांचा विजय हा सामान्य माणसाचा विजय आहे. ज्या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. त्या सर्वांची सत्काराने जबाबदारी वाढणार आहे. हाती घेतलेले काम तडीस न्या. सर्वांनी मिळून विघातक कामाला विधायक करून दाखवायचे आहे.

रवींद्र मिर्लेकर म्हणाले, “मावळ लोकसभा मतदारसंघ हा विविधतेने नटलेला आहे. तीर्थक्षेत्र, धरणे, किल्ले, एमआयडीसी, वसाहती, मोठे प्रकल्प तसेच सामाजिक विविधता या भागात आहे. त्या सर्व क्षेत्रात खासदार बारणे यांचे काम आहे. समाजाच्या तळागाळातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलेला लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार बारणे होय. जनतेशी नाळ जोडलेला माणूस जर संसदेत गेला, तर जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, हे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाणले आणि पाच वर्षे अगोदरच बारणे यांना लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले. जोपर्यंत निवडणुका लढवाल तोपर्यंत बारणे जिंकत रहाल. समाजात पोहोचून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत राहत असल्यामुळे त्यामुळे पक्ष प्रमुख वारंवार बारणे यांचे आदराने नाव घेतात. मावळ लोकसभा मतदार संघातील प्रत्येक निवडणूक शिवसेना जिंकेल अशीच बारणे यांची कारकीर्द होवो, अशा शुभेच्छा देखील मिर्लेकर यांनी दिल्या.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक संस्था आणि व्यक्तींचा गौरव केला जात आहे. ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना अनेक स्थित्यंतरे आली. प्रत्येक अडचणीला तोंड देऊन आजवरचा प्रवास झाला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडवता आले. सर्वसामान्यांसोबत मिळून काम करता आलं, याचाही आनंद आहे. जनतेने पुन्हा एकदा विश्वास ठेवून काम करण्याची संधी दिली. आजवर साथ दिलेल्या प्रत्येकाचे काम मोलाचे आहे. सहका-यांच्या पडद्यामागील भूमिकेमुळे मी आज एवढ्या मोठ्या उंचीवर पोहोचलो आहे. सन्मान केल्यास आणखी चांगल्या पद्धतीने काम करण्याची ऊर्जा मिळते. ती ऊर्जा देण्यासाठी हा गौरव सोहळा आहे.”

सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी केले. अॅड. दिलीप बोंबले पाटील यांनी आभार मानले.

समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव केला –

शिक्षणतज्ञ अ. ल. देशमुख (जीवनगौरव)
एम ए हुसेन (समाजसेवा)
रामचंद्र उर्फ आण्णा जाधव (शिक्षणसेवक)
काशीनाथ नखाते (श्रमशक्ती)
मीनल गावडे (आदर्श उद्योजक)
कुणाल साठे (धर्मवीर युवा)
धनंजय गावडे (गोसंवर्धन)
मोरया गिरिभ्रमण संस्था (गिर्यारोहण)
सुखदा सहकारी गृहरचना संस्था
रस्टन ग्रीव्हज औद्योगिक कामगार गृहरचना संस्था
चला मारू फेरफटका (उपक्रमशील संस्था)
सह्यकडा अॅडव्हेंचर (उपक्रमशील संस्था)
थेरगाव सोशल फाऊंडेशन (पर्यावरण भूषण)
संतोष ढगे (शिक्षणरत्न)
मोहनलाल संचेती (उद्योगरत्न)
शिवदुर्ग मित्र मंडळ (शिवदुर्ग)
मावळ डेअरी फार्म (महिला उद्योगरत्न)
मावळ विद्या प्रतिष्ठान (शिक्षण गौरव)
विश्वास राऊत (कामगार भूषण)
वैशाली खराडे (स्त्रीशक्ती पुरस्कार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.