Shirur: वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले दीड कोटी

एमपीसी न्यूज  – ‘कोरोना’ विरुद्धची लढाई तुटपुंज्या वैद्यकीय साहित्याच्या बळावर जिंकता येणार नाही. त्यामुळे वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यासाठी आपल्या खासदार निधीतून दीड कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे,  अशी माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर, मल्टीपॅरा मॉनिटर, इन्फ्युझन पंप, ऑक्सिजन सिलेंडर, पल्स ऑक्सीमीटर, पोर्टेबल एक्स रे मशीन, फॉगिंग मशीन तसेच डिस्पोजेबल 2 मास्क, एन 95 मास्क, पीपीई किट, हॅण्ड सॅनिटायझर, ट्रीपल लेअर मास्क आणि व्हीटीएम किट्स पॅक आदी वैद्यकीय उपकरणे व साहित्याची गरज भासत आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नांदापूरकर आदींशी चर्चा केली असता हे साहित्य कमी पडत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यामुळे तातडीने मी माझ्या खासदार निधीतून दीड कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला आहे, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

वैद्यकीय साहित्य व उपकरणे खरेदी करण्यासाठीच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असून त्यानंतर त्याची खरेदी करण्यात येईल, असेही खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

फळे व भाजीपाला घरपोच देणार !

लॉकडाऊन झाल्यानंतरही भाजीपाला व फळे खरेदी करण्यासाठी नागरिक मंडईत मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत. त्यामुळे वारंवार आवाहन करुनही सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळे आता हडपसर परिसरातील नागरिकांना बाजारभावाने फळे व भाजीपाला घरपोच देण्याची सोय जगदंब प्रतिष्ठान व लॉन्ड्री स्मार्ट यांच्यावतीने करण्यात येत असल्याची माहितीही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

नागरिकांनी आपल्या घरीच थांबावे. छोट्या छोट्या कारणास्तव बाहेर फिर नये. कोरोना विषाणूंचा संसर्गाचा गुणकार सुरू झाल्यास त्याचा धोका संपूर्ण समाजाला होणार असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार  यांनी केलेल्या आवाहनाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार्य करावे असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.