Nigdi: मोदींना पाठिंबा देणारेच खासदार मावळ, शिरुरमधून संसदेत पाठवू – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारेच खासदार मावळ आणि शिरुर मतदार संघातून संसदेत पाठवू. ते मित्र पक्षाचे देखील असतील. पण, मोदींना पाठिंबा देणार नसाल तर दोन्ही मतदार संघातून भाजपचे खासदार निवडून आणले जातील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्षाला दिला. तसेच भाजपच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र आले तरी आमच्यावर काही परिणाम होणार नाही. चार वर्षातील कामाच्या जोरावर आम्ही लोकांसमोर जाणार आहोत, असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने निगडी, प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर आज (शनिवारी) ‘अटल संकल्प महासंमेलन’ पार पडले. या संमेलनाला उपस्थित असलेल्या मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मावळ आणि शिरुरमध्ये मेळाव्या घेतल्यानंतर आम्ही लोकसभेची तयारी करत आहेत. त्यामुळे आमची युती संपली का? असे लोक विचारत आहेत. त्यांना आमचे एकच सांगणे आहे. मावळ आणि शिरुरमधून तेच खासदार निवडून जातील ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील. ते मित्रपक्षाचे असले तरी देखील त्यांना संसदेत पाठवू. पण मोदी यांना पाठिंबा देणार नसाल तर समोर दोन फोटो लागले आहेत. दोघांच्याही (लक्ष्मण जगताप, महेश लांडगे)मागे संसदेचे चित्र आहे. संसदेपर्यंत आमचेच खासदार पाठविल्याशिवाय राहणार नाही असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ही सभा कोणत्या पक्षाच्या विरोधात, कोणाला दाखवून देण्यासाठी नाही.

आमची ताकद आहेच, ही ताकद महापालिका, जिल्हा परिषदा या निवडणुकांमध्ये दाखवून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी कोण आहे. हे सगळ्यांना समजले पाहिजे. मोदी यांच्यासाठी आवाज दिल्यास किती लोक एकत्र येतात. 2014 मध्ये आम्ही निवडून आलो. त्यावेळी मोदी लाट होती म्हणाले. परंतु, आता 2019 मध्ये या लाटेची सुनामी केल्याशिवाय राहणार नाही.

देशविरोधी विचारांशी लढायचे आहे. गेल्या 60 वर्षामध्ये परिवर्तन वादातून सामान्य मानसाला गरीब ठेवले. परिवार आणि आपण याच्यापलीकडे गेले नाहीत. केवळ आपली घरे भरण्याचे काम केले. अशा विचारांशी लढण्याची, शिरच्छेद करण्याची ही वेळ आहे असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीला खुले आव्हान देतो माझ्या सोबत एका मंचावर या. 15 वर्षाचे तुमचे राजकारण आणि आमची चार वर्षाची राजवट, या चार वर्षात आम्ही उजवे ठरलो नाहीत. तर, निवडणुकीला सामोरे जाणार नाही.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय दिले. शास्तीकराचा प्रश्न सोडविला. आता न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न नक्कीच सोडविला जाईल. पाणी पुरवठ्याचा प्रश्न देखील मार्गी लावू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.