Pune : गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर खासदार काकडेंची लोकसभेची तयारी जोरात

कसबा, पर्वती व खडकवासला मतदार संघ काढला पिंजून

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत राज्यसभा खासदार व भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी खडकवासला, पर्वती आणि कसबा विधानसभा मतदार संघ अक्षरश: पिंजून काढला आहे. या भागातील गणेश मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. खासदार काकडे पुणे लोकसभा मतदार संघातून इच्छुक असून, गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी मतदार संघातील संपर्क जोरदार वाढविला आहे.

खासदार काकडे यांनी रविवारपासून शहरातील बिबवेवाडी, मार्केटयार्ड, सहकारनगर, महर्षीनगर, मुकुंदनगर, धनकवडी, पर्वती, टिळक रोड, सदाशिव पेठ व नवी पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, नारायण पेठ, शनिवार, मंडई, कसबा, बुधवार, गणेश, नाना पेठ आदी भागांतील बहुतांशी मंडळांना भेटी देण्यास सुरुवात केली. दोन दिवसांत खडकवासला, पर्वती व कसबा मतदार संघ खासदार काकडे यांनी पिंजून काढला.

गणेश भक्तांमधील उत्साह, गणेश मंडळांकडून केलेली सजावट, आरास आणि पोलीस व स्वयंसेवकांनी राखलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळे गणेशोत्सवाचा उत्तम पद्धतीने आनंद नागरिकांना घेता येत आहे. गणेशोत्सव म्हणजे भक्तीचा उत्सव. या काळात सगळीकडे आनंद व समाधान असते. यावेळी गणेशोत्सवाचे हे उत्साही रुप पाहिल्याचे खासदार संजय काकडे यांनी सांगितले. तसेच, सर्वांना सुखी आणि माझ्या अन्नदात्या शेतकऱ्यांवरील संकट दूर करून त्यांच्या जीवनातही सुखाचे दिवस येऊ देत, अशी प्रार्थनाही त्यांनी गणराया चरणी केली.

गणेशोत्सवानिमित्त अनेक जुन्या मित्र परिवाराला भेटता आले, सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देता आल्या याचा आनंद व समाधान खूप असल्याच्या भावना खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.