Hinjwadi: खासदार प्रितम मुंडे यांनी घेतली हिंजवडीतील पीडित मुलींच्या कुटुंबियांची भेट 

पिडीत कुटुंबियांना शासकीय सहाय्य आणि आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिले आश्वासन

एमपीसी न्यूज – हिंजवडी परिसरात नुकत्याच झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील ऊसतोड कामगारांच्या मुलीच्या कुटूंबियांची खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी आज (सोमवार) भेट घेतली. पीडितेच्या कुटूंबियांना शासकीय सहाय्य करण्याबरोबरच या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी सांगितले.

यावेळी पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अशोक मुंडे, भाजपा महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक, तळेगांवचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नगरसेविका योगिता नागरगोजे, प्रियांका बारसे, केशव घोळवे आणि रवि खेडकर, दीपक नागरगोजे, आबा नागरगोजे, संतोष राख, शैला मोळक आणि सारिका चव्हाण, संगीता सुतार, प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, मोरेश्र्वर शेडगे आणि इतर पदाधिकारी व महिला आघाडी मोर्चा आणि इतर कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलींवर झालेल्या अत्याचाराची गंभीर दखल घेतली आहे. पीडितेच्या कुटूंबियांची भेट घेण्यासाठी त्यांनी केलेल्या सूचनेनुसार त्यांच्या वतीने खासदार प्रितम मुंडे यांनी पीडितेच्या आई वडिलांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. झालेली घटना मन सुन्न करणारी आणि संतापजनक आहे. ‘तुम्ही काळजी करू नका, पंकजा मुंडे  आणि राज्यसरकार तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालयातून प्रकरण चालविण्यासाठी आपण आग्रह धरू, अशा शब्दांत त्यांनी धीर दिला.

हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्याकडूनही त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली. घटनेसंदर्भात पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याशी मुंडे यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. घटनेतील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांना जामीन मिळता कामा नये, असे त्या म्हणाल्या. तसेच नागरिकांनी याबाबत सोशल मीडियावर कोणत्याही अफवा पसरवू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी पीडितेच्या पित्याने ‘ताई, तुमच्या भेटीमुळे आम्हाला खरा आधार मिळाला आहे, आता तुम्हीच आमच्या माय-बाप आहात’, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.