Pimpri : राममंदिर निर्माणाच्या कायद्याचे खासदारांनी समर्थन करण्याची मागणी

खासदार अमर साबळे यांना विहिंपचे निवेदन

एमपीसी न्यूज- श्रीराम जन्मभूमीवर राम मंदिर उभारण्यासाठी कायदा करण्याची मागणी, होत आहे. त्यासाठी प्रत्येक खासदाराने या कायद्याचे समर्थन करावे आणि रामभक्त तसेच संतांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवाव्यात अशी विनंती विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक खासदाराला याबाबतचे निवेदनही देण्यात येत आहे. राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनाही याबाबतचे निवेदन विहिंपतर्फे देण्यात आले.

खासदार साबळे यांच्या निगडी प्राधिकरणातील निवासस्थानी निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायकराव थोरात, संघाचे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी, संघाचे प्रांत विशेष संपर्क प्रमुख मिलिंदराव देशपांडे, विहिंपचे प्रांत मंत्री विजयराव देशपांडे, विहिंपचे प्रांत सेवा कार्य प्रमुख दादा ढवाण, विहिंपचे शहराध्यक्ष शरद इनामदार, शहर मंत्री नितीन वाटकर, बजरंग दलाचे प्रांतपालक अशोकराव येलमार, शहर संयोजक नाना सावंत, वनवासी कल्याण आश्रमचे नरेंद्र पेंडसे, पुरुषोत्तम अनंतपुरे, दुर्गा वाहिनीचे प्रांतपालक पांडुरंग फाटक, सहकार भारतीचे जिल्हा सचिव औदुंबर नाईक भाजपाचे शहर प्रवक्ता अमोल थोरात, महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार आदी या वेळी उपस्थित होते.

खासदार साबळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हिंदू समाज 1528 पासून भव्य राममंदिर उभारण्यासाठी संघर्ष करीत आहे. या मुद्द्यावरी सातत्याने चर्चा होऊनही यश आलेले नाही. न्यायपालिकेच्या माध्यमातून या मुद्द्यावर समाधान व्हावे म्हणून 1950 पासून हा मुद्दा प्रयत्न सुरू आहेत. मात्र न्यायालयात निकाल लागण्याचा कालावधी अनिश्चित आहे. श्रीराम जन्मभूमीवर राम मंदिर उभारण्याचा 1528 पासूनच हिंदू समाजाचा दृढ संकल्प आहे. अनावश्यक आणि अनाकलनीय विलंब हिंदू समाजाच्या धैर्याची परीक्षा घेत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कायदा बनवून श्रीराम जन्मभूमीवर राम मंदिर निर्माणाचा मार्ग प्रशस्त करावा, हेच याचे एकमात्र समाधान होऊ शकते.

राज्यसभेचे खासदार म्हणून आपण रामभक्त आणि संत समाजाच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहचवाव्यात आणि श्रीराम जन्मभूमीवर राम मंदिर निर्माणाच्या कायद्याचे समर्थन करावे, अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.