Pimpri : करदात्यांच्या पैशांची लूट; पालिकेतील अधिका-यांची चौकशी करा – श्रीरंग बारणे

स्थानिक गुंडाचा बंदोबस्त करा; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पालिकेसह शहराची होत आहे बदनामी 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सगळीकडे अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण करणा-यांकडून राजकीय लोक हप्तेवसूली करतात. त्यांना स्थानिक गुंडाचे अभय आहे. प्रशासन निर्ढावले असून अधिकारी आणि  सत्ताधा-यांच्या ‘खाबूगिरी’मुळे दिवसें-दिवस शहराचा विकासाचा दर्जा खालावत चालला आहे. आयुक्त सत्ताधा-यांच्या कलानुसार काम करत असून त्यांचा प्रशासनावर कसलाही वचक राहिलेला नाही. शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे, असा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. तसेच विविध विकास कामाच्या निविदांमध्ये होणा-या भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे महापालिकेसह शहराची बदनाम होत असून आयुक्तांनी कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. 

 

पिंपरी-चिंचवड महपालिका परिसरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण, पाणीपुरवठा, बीआरटी मार्ग, कचरा समस्या व शहरातील रस्त्यांवरील खड्डे असा विविध प्रश्नासंदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (गुरुवारी)महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्यासोबत बैठक घेतली. या प्रश्नांवर चर्चा करुन हे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. बैठकीला पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेवक निलेश बारणे, प्रमोद कुटे, सचिन भोसले, नगरसेविका अश्विनी चिंचवडे उपस्थित होते. त्यानंतर बारणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 

खासदार बारणे म्हणाले,  पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ते रूंद असूनही भर रस्त्यांवर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून सध्या महापालिकेची अतिक्रमण यंत्रणाच मृत झाली आहे. त्यामुळे नागरिकांना, शाळकरी मुलांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. भर रस्त्यावर विक्रेते रस्ता अडवून विक्री करत आहेत. या छोट्या व्यावसायिकांकडून स्थानिक गुंड व राजकीय पाठबळ असलेले कार्यकर्ते राजरोसपणे हफ्ते गोळा करीत आहे. महापालिका रस्ते हे हफ्ते वसूल करण्याचे केंद्रच झाले आहे. याबाबत अधिका-यांकडे विचारणा केली असता ते टोलवा-टोलवीची उत्तरे देतात.

 

शहरातील विविध भागामध्ये कच-याची समस्या असून कच-याची विल्हेवाट तात्काळ करण्यात यावी. तसेच शहरातील पाणी गळती 38 % वर गेली आहे, हा चिंतेचा विषय असून शहराच्या विविध भागात कमी जास्त प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. पवना धरणात मुबलक पाणी असतानाही पाणीपुरवठा विभागात नियोजनाचा अभाव असल्याचे हे थोतक आहे. यावर योग्य उपाय योजना करण्याचे निर्देश दिल्याचे  खासदार  बारणे यांनी सांगितले.

 

दरवर्षी कोट्यवधी रुपये शहरातील रस्ते शहरातील रस्ते डांबरी करणावर खर्च केले जातात. परंतु, निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अंतर्गत रस्त्याची चाळण झाल्याचे चित्र संपुर्ण शहरभर आहे. शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर पडलेले खडे बुजवण्यात यावेत. तसेच खंड्यामुळे होणा-या अपघातातून जिवीतहानी होणार नाही याची दखल तात्काळ घेण्यात यावी.

 

केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून महापालिकेला मोठा आर्थिक निधी प्राप्त झाला आहे. परंतु या योजनेतून होणा-या कामामध्ये संगनमत करून निविदा भरण्याचा प्रकार सध्या चालला असून यामुळे महापालिका बदनाम होत आहे. आयुक्तांनी भ्रष्टाचारांची पाठराखण न करता पारदर्शक अंमलबजावणी करावी. गेल्या अनेक वर्षापासून बीआरटी मार्ग तयार असून या मार्गावर कोट्यवधी रुपये केंद्रशासनाच्या योजनेतून खर्च झाला आहे. त्यामुळे या मार्गावर तात्काळ बसेस चालू करण्याच्या सूचना बारणे यांनी दिल्या आहेत.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेला या आगोदर अनेक पारितोषके मिळाली आहेत. परंतु गेल्या काही दिवसांत महापालिकेचा एकंदर कारभार व कामकाजाची घसरण झाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या योजना व त्यावर होणारा खर्च पहाता केंद्र सरकारच्या सर्वेक्षणानुसार पिपंरी-चिंचवड भारतातील इतर शहराच्या तुलनेने पिछाडीवर पडले असल्याने हे अतिशय लज्जास्पद आहे.  महापालिका आयुक्तांनी सत्ताधा-यांच्या चुकीच्या निर्णयाचे समर्थन करण्याचे सोडून शहराच्या विकास कामांना गती देऊन    ख-या अर्थाने पारदर्शक कारभार करण्याची आवश्यक्ता आहे, असेही  खासदार बारणे म्हणाले. करदात्यांच्या पैशांचा उपयोग योग्य कामासाठी होणे गरजेचे आहे. आपला पैशाचा उपयोग चांगल्या कामासाठी होतो की नाही, यासाठी करदात्यांनी देखील सजग राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.