Thergaon : विद्यार्थ्यांना घर आणि शालेय शिक्षणातूनच सुसंस्कार – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज –  महिलांवरील अत्याचार हा समाजातील मानसिक रोग आहे. हा रोग कमी होणे गरजेचे आहे. चांगल्या संस्काराने हा रोग नाहिसा होईल. असे चांगले संस्कार हे प्रथम घर व शालेय शिक्षण यातूनच विद्यार्थ्यांना मिळत असतात, असे मत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्‍त केले. 

थेरगावातील श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था व शिवछत्रपती प्रतिष्ठाण यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीमध्ये 2018 च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभात  ते बोलत होते. मोरया मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमाला सिनेअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड,  आय. टी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, शिवसेनेचे मावळचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेवक निलेश बारणे, माजी नगरसेविका विमल जगताप, उपशहर प्रमुख सोमनाथ गुरज, लहू नवले, दिपाली गुजर, विश्वजित बारणे, बशिर सुतार, रवि नामदे व पतसंस्थेचे सर्व संचालक उपस्थितीत होते.

डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले की, ‘हल्ली दरोडेखोरसुद्धा पांढरपेशा झालेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ‘सायबर सिक्‍युरिटी’ मध्ये करियर केल्यास त्यास मरण नाही. विद्यार्थ्यांनी सध्याच्या पारंपरिक मोबाईल व अँड्रॉईड सारख्या क्षेत्रातून बाहेर पडून अत्याधुनिक क्षेत्र अवलंबायला हवे. 19 वे शतक हे शिक्षणाचे शतक होते. तर 20 व्या शतकातील शिक्षण व 21 व्या शतकातील विद्यार्थी यांची योग्य सांगड घातली, तर देश चालू शतकात जागतिक क्रांती करेल. परंतु, विद्यार्थ्यांनी त्यासाठी नुसती डिग्री घेऊन उपयोग नाही, तर त्यासाठी कौशल्यसुद्धा आत्मसात करायला हवे’.

यावेळी बोलताना डॉ. निशिगंधा वाड म्हणाल्या की, ‘विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर प्रथमतः माणसे समजून घ्यायला माणसे वाचायला शिकले पाहिजे आणि आपल्या कुवतीनूसार आपलं क्षेत्र निवडलं पाहिजे. कारण, नुसतं आकर्षक क्षेत्र निवडणे योग्य नाही, ते पेलल नाही तर मग निराशा येते. नेमके बूट पायात घातले नाही तर पायाला इजा होते’.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. दिलीप पाटील यांनी केले. तर,  धनाजी बारणे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.