Karjat News : खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांना यश; दुर्गम भागातील तुंगी आदिवासी पाड्यावर जाणाऱ्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर

खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून तुंगीच्या रस्त्याची पाहणी; तुंगीच्या रस्त्यासाठी 68 लाखांचा निधी खर्च

एमपीसी न्यूज – कर्जत तालुक्यातील तुंगी या आदिवासी पाड्याला जाण्यासाठी आजवर चांगला रस्ता नव्हता. या रस्त्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रासह विविध विभागांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असून सध्या हे काम प्रगतीपथावर आहे. या कामाची खासदार श्रीरंग बारणे यांनी पाहणी केली. यावेळी नागरिकांनी भरल्या डोळ्यांनी खासदार बारणे यांचे स्वागत करत आजवर कोणत्याही नेत्यांनी न केलेलं काम बारणे यांनी केल्याबद्दल ‘आप्पा प्रत्येक वेळी तुम्हीच निवडून या’ अशी भावनिक साद घातली.

स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली. यावर्षी देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. पण देशातील काही भागात अजूनही आदिवासी पाडे, वस्त्या आणि दुर्गम भागात वीज, पाणी, रस्ते अशा मुलभूत सुविधा देखील पोहोचलेल्या नाहीत.

 

कर्जत तालुक्यातील तुंगी या पाड्याची अवस्था देखील दयनीय होती. तुंगी हा आदिवासी पाडा सन 2018 पर्यंत वीज, रस्ते यापासून वंचित होता. शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सन 2018 साली त्यांच्या केंद्र आणि राज्य स्तरावर प्रयत्न करून विविध विभागांशी समन्वय साधून तुंगी या आदिवासी पाड्यावर दीनदयाळ ग्रामज्योती योजनेतून वीज पोहोचवली.

त्यानंतर या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्याने प्रयत्न केले. वन विभागाशी समन्वय साधून तुंगी या आदिवासी पाड्यापर्यंत रस्ता करण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरु आहे. शिवसेनेचे विभाग प्रमुख दिनेश भोईर यांची खासदार श्रीरंग बारणे यांना या कामासाठी साथ मिळत आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांच्या खासदार निधीतून हे काम सुरु केले आहे. या रस्त्याच्या कामासाठी आतापर्यंत 68 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

रस्त्याच्या कामाची पाहणी आणि नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी नुकतीच तुंगीला कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक भेट दिली. विशेष म्हणजे तुंगीमध्ये जाणारी पहिली गाडी ही खासदार श्रीरंग बारणे यांची होती. आजवर कोणतीही गाडी या पाड्यावर आलेली नव्हती. डोंगर भागातील खडतर रस्ता असल्याने तुंगीला वाहन जाणे शक्य नव्हते. आता सर्व प्रकारची वाहने तुंगीला सहज जाऊ शकणार आहेत.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “शहरी भागात सर्व सुखसोयी असतात. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केला जातो. रस्त्यावर एखादा खड्डा पडला तरी लगेच चर्चा होते. वीजपुरवठा खंडित झाला तर लगेच संबंधित यंत्रणांना फोन केला जातो. परंतु ज्या ठिकाणी व्यवस्थाच नाही. रस्त्यावरील खड्ड्याची तक्रार करण्यासाठी रस्ताच नाही, अशा दुर्गम भागात रस्ता, वीज पोहोचविण्याचे काम मी केले आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे.”

तुंगीला जाण्यासाठी रस्ता केला जात आहे. भविष्यात यावर डांबरीकरण होईल. रस्ता अधिक चांगला होईल आणि नागरिकांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळेल. सुविधा निर्माण झाल्याने गरीब, आदिवासी लोकांच्या चेह-यावरील आनंद यानिमित्ताने मला बघायला मिळाला. त्यांच्या चेह-यावरील समाधान हे माझ्या जीवनातील सर्वात मोठे संचित असल्याचेही खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.

खासदार श्रीरंग बारणे यांचे नागरिकांकडून जल्लोषात स्वागत

खासदार श्रीरंग बारणे यांनी मागील काही वर्षांपासून तुंगीमध्ये केलेल्या कामाची पावती स्वतः नागरिक देत आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांनी तुंगीला जाण्यासाठी होत असलेल्या रस्त्याची पाहणी केली. खासदार बारणे तुंगीमध्ये पूर्वकल्पना न देता अचानक गेले. तरीही नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. लहान मुलांनी बॅंड वाजवून त्यांचे स्वागत केले. ‘आप्पा तुम्ही जे आमच्यासाठी काम केलं. ते आजवर कुणीही केलेलं नाही. आमच्यासाठी प्रत्येक वेळी तुम्हीच निवडून या’ अशी खासदार बारणे यांनी केलेल्या कामाची पावती देखील तुंगीतील नागरिकांनी दिली.

आता रुग्णांना झोळीतून न्यावे लागणार नाही.

तुंगी येथील नागरिकांची आजारपणात, पावसाळ्याच्या दिवसात मोठी कसरत होत असे. वाहन पोहोचू शकत नसल्याने इथले नागरिक आजारी व्यक्तींना झोळीतून रुग्णालयात घेऊन जात. अशी बिकट अवस्था पुन्हा नागरिकांवर येऊ नये म्हणून खासदार श्रीरंग बारणे यांनी तुंगीला रस्ते मार्गे जोडण्याचा निर्णय घेतला आणि पाठपुरावा करून रस्त्याचे काम सुरु केले. हे काम प्रगतीपथावर असून लवकरच या रस्त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. आता नागरिकांना झोळीतून रुग्णालयात न्यावे लागणार नाही. रस्ता झाल्याने आरोग्याच्या सोयी सुविधा तुंगीमध्ये सहज पोहोचू शकणार आहेत. केवळ एका रस्त्यामुळे तुंगीतील नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे.

मतांच्या बेरजेसाठी नाही तर लोकांच्या गरजेसाठी हा अट्टाहास

खासदार श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात सुमारे 25 लाख मतदार आहेत. त्यांनी या संपूर्ण मतदारसंघात कामांचा झंझावात चालवला आहे. पण केवळ मते मिळविण्यासाठी जास्त मतदार असलेल्या ठिकाणी सर्व कामे न करता 100-150 लोकवस्ती असलेल्या आदिवासी पाड्यांवर देखील त्यांनी तेवढ्याच प्रमाणात कामे केली आहेत. तुंगीत विजेसाठी लाखो रुपये खर्च केल्यानंतर आता रस्त्यासाठी 68 लाखांहून अधिक निधी खर्च केला जात आहे. मतांची बेरीज करणारे नेते 100-150 लोकवस्ती असलेल्या ठिकाणी काम करणे पसंत करीत नाहीत. मात्र खासदार श्रीरंग बारणे हे मतांची बेरीज करणा-या नेत्यांपैकी नसून त्यांनी खासदार निधी मोठ्या प्रमाणात तुंगीसारख्या आदिवासी कमी लोकवस्ती असलेल्या पाड्यावर वापरला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.