Mpc Editorial : गुन्हेगारांच्या ‘बनाव’गिरीला येरवड्याची हवाच !

एमपीसी न्यूज – आपण आतापर्यंत "सत्तेपुढे शहाणपण चालत नाही", ही  म्हण ऐकली असेल. पण, आठवडाभरात लागोपाठ घडलेल्या गुन्हेगारी घटनांवरून "पोलिसांपुढेही शहाणपण चालत नाही", हे अधोरेखित झाले. आपले प्रेम मिळविण्यासाठी पसरणी घाटात नव-याला, तर हिंजवडी परसिरात बायको व मुलाला संपविल्याची अशा दोन वेगवेगळ्या घटनांमुळे गुन्हेगारी जगतातील बनाव चर्चिला जात आहे. त्यात कामशेतच्या निहाल या तरुणाच्या ‘आत्महत्या की हत्या’ या प्रकरणाने भर घातली. पण, या तिन्ही घटनांमुळे पोलिसी खाक्यापुढे गुन्हेगारांची ‘बनाव’गिरी निभावणार नाही, हे एकप्रकारे सिद्ध झाले आहे. त्यातून अशा प्रवृत्तींनी धडा घ्यायला हवा, अन्यथा बनावगिरी करणा-या गुन्हेगारी प्रवृत्तींना ‘येरवड्याची हवा’च खावी लागणार.  
 
‘जे घडलंच नाही, ते घडल्याचे भासविणे’ यालाच एका शब्दात ‘बनाव’ म्हणतात. यापूर्वी कुटुंबातील व्यक्ती किंवा आप्तेष्टांकडून पैसे मिळविण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा बनाव केल्याचे अनेक गुन्हे घडले आहेत. पण, पोलिसांनी अपहरणासारख्या असंख्य संवेदशनशील गुन्ह्यांचा छडा लावला. अलीकडे एखाद्याची नियोजनबद्ध हत्या करून त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न गुन्हेगार करतात. स्वत:च एखाद्याला जिवानिशी संपवून ‘तो मी नव्हेच’ हा पवित्रा गुन्हेगार घेतात. पद्धतशीररित्या पोलिसांच्या तपासाची दिशा फरकटविण्यासाठी ही पद्धत गुन्हेगारांकडून वापरली जाते. पण, पोलीस यंत्रणा कमी नसून तेही अशा बनवाबनवी करणा-या गुन्हेगारांना आपला हिसका दाखवितात. हे नुकत्याच लागोपाठ घडलेल्या तीन एकसारख्या घटनांमध्ये हे दिसून आले. पसरणी घाटातील आनंद कांबळे खून प्रकरणात त्याची पत्नी दिक्षा हिने त्याच्या खुनाचे कारस्थान रचले. प्रियकर निखिल मळेकर यांच्या मदतीने आपल्याच नव-याचा काटा काढला. फिरायला जाताना उलटी आली म्हणून थांबायला लावणे. नेमका त्याचवेळी हल्ला होणे. दागिने पळवून नेणे आणि जखमी होणे.  
 
या गोष्टींवरून सुरुवातीला हा सगळा लुटमारीतून झालेला प्रकार असल्याचे भासविण्याचा प्रयत्न दिक्षाकडून करण्यात आला. पण, काही तासात हा बनाव असल्याचे उघड करून पोलिसांनी सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या. हे प्रकरण लोकांच्या चर्चेतून संपते ना संपते तोच हीच पद्धत वापरून आणखी एक खून प्रकरण हिंजवडीत घडले. दत्ता भोंडवे नावाच्या महाभागाने प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी अडथळा ठरणा-या पत्नीचा गळा आवळून, तर पोटच्या आठ महिन्याच्या चिमुरड्याचा गळा चिरून हत्या घडवून आणली. प्रेमाच्या नावाखाली झालेले हे दोन्ही गुन्हे ‘प्रेम’ आणि ‘माया’ या दोन्ही आपुलकीच्या शब्दांना कलंक लावणारे ठरले. आरोपी दत्ताने लुटमारीचा बनाव रचला. स्वत: जखमी झाल्याचे नाटक करून उपचारही सुरू केले आणि मारेक-यांच्या विरुद्ध त्यानेच पोलिसात तक्रार दिली. गुन्हा लपविण्यासाठी ही सगळी बनवाबनवी त्याने केली. पण, ती बनवाबनवी उघड करायला पोलिसांना बारा तासही लागले नाहीत.  

 
इकडे हिंजवडी पोलिसांनी दत्ता भोंडवेसह त्यांची प्रेयसी व तिच्या दोन मित्रांना गजाआड केले. बनवाबनवी करणा-या या गुन्हेगारांना गजाआड केले. दुसरीकडे त्याच रात्री मावळातील कामशेतमध्ये एका हॉटेलात चिंचवडच्या निहाल नाणेकर याने स्वत: गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे प्रकरण घडले. चिंचवडमध्ये जीवघेण्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या मित्राच्या आठवणीत अतिव दु:ख झाल्याने निहालने आत्महत्या केल्याचे चित्र त्याच्या मित्रांनीच रंगवले. पण, हा देखील बनाव असल्याचे उघड करण्यात पोलिसांना वेळ लागला नाही. सोबतच्या दोन्ही मित्रांनी निहालवर गोळ्या झाडून त्याचा खून केल्याचा आरोप असून तसा गुन्हा दाखल झाला आहे.  
 
गृहकलह, व्यावसायिकवाद, प्रेमसंबधातून घडलेल्या गुन्ह्यातील गुन्हेगार सराईत मुळीच नसतात. त्याच्याकडून एकदाच गुन्हा केला जातो. परंतु, पोलीस रोज अशा वेगवेगळ्या गुन्हेगारांचा सामना करत असतात. त्यांच्या मुसक्या आवळत असतात. तरीही पोलिसांना हूल देऊन आपण केलेला गंभीर गुन्हा पचवू, हा गैरसमज सोबत घेऊन हे गुन्हेगार वावरतात. पण, अलिकडे तंत्रज्ञान व माहितीच्या आधारामुळे एखादा गुन्हा सहजासहजी पचविणे शक्य राहिलेली नाही. पोलिसांची इच्छाशक्ती आणि पोलिसी खाक्या नेमका वापरल्यास ‘बनावगिरी’ करणा-या अशा गुन्हेगारांना पकडणे अवघड नाही. हेच या घटनांमधून अधोरेखित झाले. वर्षानुवर्षे काही प्रकरणांचा छडा पोलिसांना लागत नाही. मात्र, या तिन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी आपली कार्यकुशलता दाखवून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
पोलीस किंवा कुठलीही तपास यंत्रणा गुन्ह्यातील बारकावे तपासून धोगेदोरे मिळवून आणि संशयित व्यक्तीचा माग काढून गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याची किमया साधत असतात. कितीही चलाखी केली, तरी गुन्हेगारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जरब बसेल, असा संदेश या प्रकरणांमधून निश्चितपणे गेला. परंतु, तरी देखील त्याचप्रकारे गुन्हा करण्याचे धाडस केले जाते. ही बाब एक प्रकारे धक्कादायक असून लोक कशासाठी कोणत्या थराला जातील ? याचाही आता नेम राहिलेला नाही. या गुन्हेगारी घटनांमुळे सामाजिक स्वास्थ बिघडत असते. त्यावर वेळीच उपाय झाले नाहीत, तर हा आजार गंभीर होऊन त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागतात. पोलीस यंत्रणा गुन्हेगारी प्रवृत्तींना या प्रकारे जागच्या जागी ठेचण्यात यशस्वी झाल्यास गुन्हा करण्याची प्रवृत्ती बळावणार नाही. हा आशावादी विचार या सगळ्यातून पुढे येतो. तर, औटघटकेच्या संतापातून, व्देषातून आयुष्याचे वाटोळे करून घेण्याची अशी वाट कोणी धरू नये, हा धडा घेणे गरजेचे आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.