Interview with Raju Misal:: मी ‘अ‍ॅडजस्ट’ होत नाही आणि होणारही नाही; सभागृहात आक्रमकता दिसेल- राजू मिसाळ

मैत्री आणि संबंधाचा माझ्या कामावर काही परिणाम होणार नाही. मैत्री हा भाग वेगळा असतो. पालिकेचे कारभारी असलेले लक्ष्मणभाऊ किंवा महेशदादा सत्तेच्या माध्यमातून चुकीचे काम करत असतील. तर ती कामे मी थोपवणार आहे.

एमपीसी न्यूज (गणेश यादव) – मी सत्ताधाऱ्यांसोबत कधी ‘अ‍ॅडजस्ट’ झालो नाही, होत नाही आणि भविष्यातही होणार नाही. स्थायी समितीतील ठराव काढून बघा, चुकीच्या प्रत्येक विषयाला मी विरोध केला आहे. आमचा विरोध नोंदवून सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर चुकीचे विषय मंजूर केले आहेत. माझी आक्रमकता सभागृहात दिसेल असे सांगत पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नियोजित विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी आपली पुढील भूमिका स्पष्ट केली. आमचे लक्ष्य 2022 असून त्यादृष्टीने आम्ही काम करणार आहोत. भाजपने साडेतीन वर्षांत केलेली चुकीची कामे जनतेच्या दरबारात मांडणार आहे असेही त्यांनी सांगितले.

पालिकेत निगडी, प्राधिकरणाचे प्रतिनिधित्व करणारे राजू मिसाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड झाली आहे. त्यांची पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड निश्चित आहे. पुढील कामकाजाबाबत ‘एमपीसी न्यूज’चे राजकीय प्रतिनिधी गणेश यादव यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद..

प्रश्न: उपमहापौर, क्रीडा समिती सभापती, स्थायी समितीत तुम्ही काम केले आहे. त्याचा विरोधी पक्षनेतेपदी काम करताना किती फायदा होईल?

उत्तर:- अनुभव हा कायमच फायदेशीर ठरत असतो. सत्तेत असताना आम्ही काम केले. त्याचाही फायदा होईल. सध्या सर्वजण कोरोनाशी लढा देत आहेत. लोकांच्या हितासाठी करत असलेल्या गोष्टीत काही गडबड होऊ नये. ज्या निविदा झाल्या आहेत. त्याच्यावर नियंत्रण असेल. विरोधाला विरोध करणार नाही. नागरिकांच्या हिताच्या गोष्टीला नक्कीच पाठींबा दिला जाईल.

चुकीच्या कामाला नक्कीच प्रखरपणे विरोध करणार आहोत. ते काम हाणून पाडले जाईल. अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट झाला आहे. आजही दादांच्या आदेशानुसार मंजूर केलेली कामे शहरात सुरू आहेत. मी उपमहापौर असताना निगडीतील तीन मजली पुलाचे काम झाले आहे. तो पूल लवकरच सूरु होईल.

प्रश्न: पालिका निवडणुकीला 15 महिने बाकी आहेत. पक्षाची प्रतिमा कशी सुधारणार?

उत्तर:- 2022 डोळ्यासमोर आहे. दादांनी विश्वास ठेवून मला पद दिले आहे. त्याला पात्र ठरवून दाखविणार आहे. भाजपने साडेतीन वर्षांत केलेल्या चुका, चुकीची कामे नक्कीच जनतेपर्यंत पोहोचविणार आहे. माझ्याकडेही अनेक तक्रारी आल्या आहेत. त्या जनतेच्या दरबारात मांडणार आहोत.

प्रश्न: सभागृहात आक्रमक की मवाळ भूमिका असेल?

उत्तर:- तुम्ही पाहाल. किती आक्रमक असेल. माझी भूमिका पूर्णपणे आक्रमक असणार आहे. मी पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात भाग घेतला आहे. दादांनी दिलेली जबाबदारी सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करणार आहे.

सर्व नगरसेवकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणार, समन्वय ठेवणार आहे. शहरातील पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षातील सर्व नगरसेवकांना सोबत घेवून मी काम करणार आहे.

प्रश्न:- अनेक दिग्गजांना डावलून तुम्हाला पद मिळाले आहे. बाकी इच्छुकांची नाराजी कशी दूर करणार?

उत्तर:- अनेकजन दावेदार होते. आमच्या पक्षात दादांनी घेतलेला निर्णय सर्वांना मान्य असतो. त्यानंतर कोण नाराज होत नाही. आम्ही कुटुंबाप्रमाणे पक्षात सर्वजण एकत्र आहोत. कोणाची नाराजी असेल. तर, मी स्वतः त्यांची भेट घेवून नाराजी दूर करणार आहे. अजित गव्हाणे यांच्याशी माझे बोलणेही झाले आहे. माझे कोणाशी वैर नाही. पक्षाचे काम एकनिष्ठपणे करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रश्न: तुम्ही ‘अ‍ॅडजस्ट’ होता असा आक्षेप नेहमीच तुमच्यावर घेतला जातो?

उत्तर:- अजिबात नाही. मी ‘अ‍ॅडजस्ट’ होत नाही. स्थायी समितीतील ठराव काढून बघावेत. चुकीच्या विषयाला मी विरोध केला आहे. आमचा विरोध नोंदवून सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर चुकीचे विषय मंजूर केले आहेत.

भांडार विभागाच्या अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने केलेली रेनकोट, शूजची कामे बाहेर काढली होती. त्या अधिकाऱ्याची चौकशी पण लावून घेतली. त्यानंतर तो अधिकारी बदली करून निघून गेला.

प्रश्न: अजितदादा तुमच्यावर एवढे मेहेरबान का आहेत?

उत्तर:- दादांना बोलघेवडे लोकं आवडत नाहीत. काम करणारा कार्यकर्ता आवडतो. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी पाठीमागे नसताना 2007 ला उमेदवारी देवून संधी दिली. त्यात माझ्या कामाची चुणूक पाहिली.

सावरकर उद्यान, प्रभागातील दोन नाट्यगृह एकत्र ही संकल्पना मी राबविली. दादांनी माझे व्हिजन पाहिले. उपमहापौर असताना काम करण्याची पद्धत पाहिली. त्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला दादांनी फार मोठा बहुमान दिला आहे. कोणतीही निवडणूक असो, दादांचा शब्द कधी मी तोडला नाही. जी कामे दादांनी सांगितली ती करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे.

प्रश्न: भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे तुमचे मित्र आहेत. तर, आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. त्याचा कामगिरीवर परिणाम होईल का?

उत्तर:- मैत्री आणि संबंधाचा माझ्या कामावर काही परिणाम होणार नाही. मैत्री हा भाग वेगळा असतो. पालिकेचे कारभारी असलेले लक्ष्मणभाऊ किंवा महेशदादा सत्तेच्या माध्यमातून चुकीचे काम करत असतील. तर ती कामे मी थोपवणार आहे.

केबलचा व्यवसाय माझा खासगी व्यवसाय आहे. त्याचे काम पालिकेत नव्हे महाराष्ट्रात करत आहे. या कामात देखील कोणी किती त्रास मला दिला आहे. याची मला माहिती आहे. ती जनतेसमोर देखील मी मांडतो. पालिकेतील केबलचे काम होऊन गेले आहे.

प्रश्न: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार तर पालिकेत भाजपची सत्ता आहे. एखादा राज्य सरकारशी संबंधित प्रस्ताव असल्यास मंजूर करून घेताना अडचण येईल का?

उत्तर:- महापालिकेने केलेला शहराच्या हिताचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मान्य करून आणला जाईल. लोकहिताच्या कामांना प्राधान्य दिले जाईल.

प्रश्न: दत्ता साने, जावेद शेख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरील निवडणुकीत पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान कसे पेलणार?

उत्तर:- माझी निवड मी जावेदभाईंना समर्पित करतो. कारण दादांनी जावेद शेख यांना विरोधी पक्षनेता करण्याचे ठरविले होते. नाना काटे यांच्यावेळीच शेख यांना पद दिले जाणार होते. त्यावेळी शेख यांनी समजूतदारपणा दाखवत काटे यांना पद द्या. मला पुढच्या वर्षी द्या अशी भूमिका घेतली.

यावर्षी मला पद मिळणे अपेक्षित नव्हते. शेख असते तर त्यांनाच हे पद मिळाले असते. मीही त्यांच्यासोबत राहिलो असतो. साने आणि शेख दोघेही हमखास निवडून येणारे आमचे उमेदवार होते. आकुर्डी आणि चिखली प्रभागात मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध करण्यासाठी पक्षाचे नेते मिळून प्रयत्न करणार आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.