Mpc Exclusive Interview: आव्हानं स्वीकारायला आवडतं, कोरोना काळात जबाबदारी घेतल्याचे दुःख नाही- डॉ. गोफणे

कोरोना नवीन आजार असल्यामुळे समाजात खूप भीती होती. कोरोनामध्ये काम करण्यास कोण तयार होत नव्हते. सुरुवातीला सर्वच पातळीवर अनेक अडचणी येत होत्या. डॉक्टर, नर्स, कर्मचारी काम करण्यास उपलब्ध होत नव्हते.

एमपीसी न्यूज (गणेश यादव) – मला आव्हानं स्वीकारायला आवडते. त्यामुळे कोरोनात मी स्वतःहून पुढे येवून जबाबदारी घेतली. पण रुग्णसेवा करत असताना मला नकळतपणे कोरोनाची लागण झाली. मी गंभीर झालो. तरी आपण स्वतःहून जबाबदारी घेतल्याचे कधीच दुःख वाटले नाही. संकटाच्या काळात मला घरी बसून राहणे योग्य वाटतं नाही. आपण डॉक्टर आहोत. डॉक्टरने डॉक्टरची जबाबदारी घेतलीच पाहिजे. त्यामुळे रुग्ण सेवेत पुन्हा रुजू झालो असल्याचे कोरोनाच्या दाढेतून बाहेर आलेले पिंपरी पालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनावर मात करून पालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी, भोसरी नवीन रुग्णालयाचे प्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे पुन्हा रुग्णसेवेत दाखल झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद

प्रश्न: कोरोनाच्या भीतीने कोण पुढे येत नसताना तुम्ही स्वतःहून आव्हान म्हणून जबाबदारी घेतली?

उत्तर:- कोरोनामध्ये काम करण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे मी कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे मी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना सांगितले होते. मला आव्हान स्वीकारायला आवडते. 14 मार्चपासून भोसरी नवीन रुग्णालयाची जबाबदारी देताच मी तत्काळ ती स्वीकारली. कोरोना विरोधातील लढाई सुरू केली.

प्रश्न: कोरोना आजार पहिल्यांदाच आलेला आहे, रुग्णांबाबतचे अनुभव कसे आहेत?

उत्तर: – कोरोना नवीन आजार असल्यामुळे समाजात खूप भीती होती. कोरोनामध्ये काम करण्यास कोण तयार होत नव्हते. सुरुवातीला सर्वच पातळीवर अनेक अडचणी येत होत्या. डॉक्टर, नर्स, कर्मचारी काम करण्यास उपलब्ध होत नव्हते.

उपलब्ध मनुष्यबळात आम्ही काम केले. रुग्णसंख्येत हळूहळू वाढ सुरू झाली होती. सुरुवातीला नागरिक खूप घाबरत होते. त्यामुळे नागरिकांची भीती कमी कमी करावी लागत होती. आता त्यातुलनेत भीती कमी झाली आहे.

प्रश्न: कोरोना रुग्णांची सेवा करत असताना तुम्हालाच संसर्ग झाला, तेव्हा काय भावना मनात आल्या होत्या?

उत्तर:- रुग्णांमुळे मी बाधित झालो नाही असे मला वाटते. आम्ही सोबत काम करणारे तीन डॉक्टर गेस्ट हाऊसला राहत होतो. माझ्यासोबतचे डॉ. शगुण पिसे यांना पहिल्यांदा बाधा झाली. कारण ते 24 तास वार्डात काम करत होते. त्यामुळे त्यांना बाधा झाले. आम्ही तिघे एकत्र राहायचे, जेवण करायचो. त्यामुळे मी आणि डॉ. ढगे आम्ही तिघे बाधित झालो.

मी गंभीर झालो. तरी आपण स्वतःहून जबाबदारी घेतल्याचे कधीच दुःख वाटले नाही. मला मधुमेह आणि रक्तदाब हे आजार असल्याने माझी प्रकृती गंभीर झाली होती. अनेक रुग्णांना कोरोनाच्या दाढेतून बाहेर काढल्याने मी सुरुवातीला भोसरी रुग्णालयातच उपचार घेतले. गंभीर झाल्यावर दुसरीकडे शिफ्ट झालो. पण, स्वतः जबाबदारी घेतल्याचे कसलेच दुःख नाही. आजही भोसरी रुग्णालयात काम करत आहे.

प्रश्न: बरे होऊन पुन्हा रुग्णसेवेत दाखल झालात, त्याबाबत काय सांगाल?

उत्तर:- आता अधिक जोमाने काम करत आहे. आपल्याला तेवढा त्रास झाला. त्यामुळे रुग्णांना किती त्रास होत असेल याची जाणीव होते. त्यामुळेच रूग्णांना वेळचेवेळी औषधे, इंजेक्शन देण्याच्या सूचना देतो. रुग्णाला सर्व सुविधा, औषधे देण्याचे कटाक्षाने पाळतो.

रेग्युलर तपासणी वेळेतच होईल याची दक्षता घेतो. कशाचीही कमतरता भासू दिली जात नाही. पूर्वीपण संपूर्ण काळजी घेत होतो. पण मला अनुभव आल्यानंतर अधिक काळजी घेतो. माझ्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार झाले. तसे उपचार करण्याचा प्रयत्न करतो. कर्मचाऱ्यांना सांगतो तुम्ही अधिक काळजी घ्या, बाधित होऊ नका, मी कसा बाधित झालो हे त्यांना सांगतो. तुम्ही तसे होऊ नका, व्यवस्थित काळजी घ्यावी.

प्रश्न: रुग्ण सेवा करताना पुन्हा कोरोनाची लागण होण्याची भीती वाटते का?

उत्तर:- नक्कीच थोडीफार मनात भीती आहे. परत संसर्ग झाला तर कसे, आई-वडील, पत्नी, नातेवाईक, मित्र हितचिंतक खूप घाबरले होते. तू रुग्णालयात का रुजू झाला असे आजही सर्वजण म्हणत आहेत. प्रशासनाने कधीच रुजू व्हाव असे सांगितले नाही. पण मी स्वतःहून रूजू झालो आहे.

संकटाच्या काळात मला घरी बसून राहणे योग्य वाटतं नाही. मी खूप गंभीर झालो होतो. मनामध्ये थोडी भीती आहे. परंतु, परत बाधित झालेल्यांना लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे काही होणार नाही. असा आत्मविश्वास वाटतो. आपण डॉक्टर आहोत. डॉक्टरने डॉक्टरची जबाबदारी घेतलीच पाहिजे. त्यामुळे रुग्णालयात रुजू झालो आहे.

प्रश्न: भोसरी रुग्णालयातून आजपर्यंत किती रुग्ण बरे झाले?

उत्तर:- आजपर्यंत चार हजाराहून अधिक रुग्णांच्या चाचण्या केल्या. त्यातील सुमारे 1800 पॉझिटिव्ह रूग्णांवर यशस्वी उपचार केले. बरे करून घरी सोडले आहे. भोसरी रुग्णालयात एकाचाही मृत्यू झाला नाही. रुग्ण गंभीर होताच त्याला तत्काळ पुढील उपचारासाठी शिफ्ट केले जाते.

प्रश्न: शहरातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत काय सांगाल, कशामुळे रुग्णवाढ होत आहे?

उत्तर:- शहरात कम्युनिटी स्प्रेड झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. पूर्वी बाधित रुग्णांच्या नातेवाईकाला शोधत होतो. पण, आज तशी परिस्थिती राहिली नाही. शहरात सगळीकडे पसरला आहे. कोणाला पण कधीपण होऊ शकतो. त्यामुळे संख्या वाढणार आहे. पण त्यात मोठी दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.

85 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांना काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. केवळ 15 टक्के रुग्णांना लक्षणे आहेत. शहराचा मृत्युदर देखील कमी ठेवण्यात यश आले आहे. त्यामुळे ही समाधानाची बाब आहे. रुग्णांच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून असतो. गंभीर रुग्ण झाला की तत्काळ वायसीएमला शिफ्ट केला जातो. भोसरी रुग्णालयात एकही मृत्यू झाला नाही. सर्व रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.