एमपीसी न्यूज – सृजनाची आस, नावीन्याचा ध्यास, शिकण्याची जिद्द आणि शिकवण्याची धडपड करणारा व्यक्ती म्हणजे शिक्षक. शिक्षक हा केवळ शाळेत, महाविद्यालयातच असतो, असे नव्हे. तर खरे शिक्षक शाळा, महाविद्यालय यांच्यासोबत पावलोपावली भेटत राहतात. योग्य मार्गदर्शन करणारी प्रत्येक व्यक्ती शिक्षक असते. अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर शिक्षणाच्या होडीतून अज्ञानाचा सागर पार करायला लावणाराच खरा शिक्षक असतो, असं मत व्यक्त केलंय फार कमी वयात औद्योगिकनगरीत शिक्षण क्षेत्रात मोठी उंची गाठलेले. तसेच अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांना घडवणाऱ्या अमित गोरखे यांनी!

भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिवशी (5 सप्टेंबर) देशभर शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षकांबद्दल एक खूप चांगला सुविचार आहे – माता-पिता की मुरत है गुरु, इस कलयुग में भगवान की मुरत है गुरु. शिक्षकांना आई-वडील आणि देवासमान दर्जा दिला जातो. हेच शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करतात.

अमित गोरखे यांचे शिक्षण क्षेत्रातील काम लक्षणीय आहे. त्यामुळे यावर्षी शिक्षक दिनानिमित्त एमपीसी न्यूजच्या विशेष मुलाखतीत अमित गोरखे यांचे शिक्षक आणि शिक्षण या विषयावर विचार जाणून घेतले आहेत.

प्रश्न : फार कमी वयात शिक्षण क्षेत्राशी जोडले गेलात, या क्षेत्राची आवड कुठे आणि कशी निर्माण झाली ?

उत्तर : माझी आई शिक्षिका आहे. आईने सीएमएस ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षण या दोन्हींचे बाळकडू घरातच मिळाले. एक शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनात किती अमूलाग्र बदल घडवू शकतात, हे त्यानिमित्ताने जवळून अनुभवता आलं.

शिक्षणाची सुरुवातीपासूनच आवड होती. त्यातच काहीतरी चांगलं करायचं हा मानस होताच. त्यात नंतरच्या काळात पुण्यात मॉडर्न महाविद्यालयात शिक्षण घेत असताना डॉ. पी डी पाटील, डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. गजानन एकबोटे यांच्या संपर्कात आलो.

त्यांच्या मार्गदर्शनातून शाहूनगर येथे पहिली संगणक संस्था सुरु केली आणि शिक्षण क्षेत्रातला प्रवास सुरु झाला.

प्रश्न : शिक्षकी पेशामध्ये व्यावसायिकता आली आहे, त्याबद्दल काय सांगाल ?

उत्तर : पूर्वीचे शिक्षक व्यावसायिक नव्हते. उदरनिर्वाह करण्यापुरते अर्थार्जन करून ते विद्यादानाचे काम करायचे. पण अलिकडच्या काळात शिक्षणाचं व्यावसायीकरण झाले.

प्रत्येकाला आपला मुलगा डॉक्टर, इंजिनिअरच झाला पाहिजे, असं वाटायला लागलं आणि त्यातून खासगी क्लासेस आणि इतर संसाधनांची गरज निर्माण झाली.

एखादा शिक्षक एखाद्या शाळेत, महाविद्यालयात शिक्षक म्हणून विद्यादानाचे काम करत असेल तर त्या शिक्षकाने खासगी क्लासेसमध्ये शिकवणे चुकीचे आहे.

कारण एक शिक्षक शाळेत असताना किमान आठ तास काम करतात. त्यात त्यांची दिवसभराची पूर्ण बौध्दिक आणि शारीरिक ताकद वापरली जाते. त्यानंतर मनाच्या विरोधात जाऊन शिक्षक खासगी क्लासेसमध्ये जाऊन पुन्हा शिकवतात. त्यामुळे ते तिकडे 100 टक्के परफॉर्मंस देऊ शकत नाहीत. शिकवण्याची नैसर्गिक क्षमता संपल्यानंतर पुन्हा शिकवणं हे नैतिकदृष्ट्या चुकीचेच आहे.

प्रश्न : राजकीय क्षेत्रात काम करत असताना शिक्षण क्षेत्रातील कामाचा फायदा होतो का? कसा ?

उत्तर : राजकीय क्षेत्रात काम करत असताना शिक्षण क्षेत्रातील कामाचा नक्कीच फायदा होतो. शिक्षण क्षेत्रात कोणतेही काम करत असताना त्याचा प्रथम अभ्यास केला जातो. त्यातील उणीवा काढून त्यावर समाधान शोधले जाते. योग्य मांडणी केली जाते.

शिक्षण क्षेत्रात काम करताना अहंकार धुळीला मिळतो आणि जमिनीशी नाळ जोडून काम केलं जातं. या सगळ्या गोष्टींचा राजकीय क्षेत्रात खूप फायदा होतो.

शिक्षण क्षेत्रातील एखादी व्यक्ती राजकीय अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात गेली तर त्या व्यक्तीमध्ये नम्रपणा, शांतपणा, मितभाषी असे गुण आलेले असतात. शहरातील उदाहरण द्यायचं झालं तर प्रा. रामकृष्ण मोरे याचं देता येईल. प्रा. मोरे सर एक शिक्षक होते. त्यानंतर ते राजकीय क्षेत्रात गेले.

राजकीय क्षेत्रात काम करताना ते कधीच कुणावर रागावले अथवा चिडले नाहीत, मनमिळावू आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची सांघिक भावना शिक्षण क्षेत्रातूनच मिळते.

प्रश्न : बदलत्या शिक्षण पद्धती बद्दल काय मत आहे?

उत्तर : पूर्वी गुरुकुल शिक्षण पद्धती होती. त्यानंतर शाळा सुरु झाल्या. अलिकडच्या काळात त्याचे ऑनलाईन माध्यमात रुपांतर होत आहे. पण पूर्णवेळ ऑनलाईन शिक्षण घेणं मुलांच्या, पालकांच्या आणि शिक्षकांच्या दृष्टीने घातक आहे.

अगदी पहिल्या वर्गापासून पदवी आणि त्यापुढच्या वर्गांसाठी सुद्धा ऑनलाईन शिक्षण व्यवस्था सुरु झाली आहे. बदलत्या काळानुसार ऑनलाईन शिक्षण पद्धती स्वीकारायला हवी, पण ती पूर्णवेळ न स्वीकारता मर्यादित स्वरुपात स्वीकारली पाहिजे.

विद्यार्थी सकाळी चार तास शाळेच्या नावाखाली ऑनलाईन येतो. त्यावेळी जबाबदारी म्हणून पालकही मुलासोबत बसतात. याचे शिक्षकांवर काही अंशी दडपण येते.

त्यात एखादा पालक घरातील कामानिमित्त इकडे तिकडे गेला, तर संबंधित विद्यार्थी गुगल विद्यापीठाच्या माध्यमातून जगाची सफर करून येतो. त्याचं इंटरनेट सर्फिंग कितपत चांगलं आहे, तो इंटरनेटला किती सकारात्मकतेने वापरतो आहे, हा संशोधनाचा विषय आहे.

चार तास ऑनलाईन शाळा, दोन तास खासगी शिकवण्या, दोन तास टीव्ही, एखादा-दुसरा तास अन्य मनोरंजन अथवा अन्य गोष्टींसाठी टीव्ही, मोबाईल किंवा संगणकाच्या स्क्रीनसमोर बसणं; असा दिवसभरातला एकूण सुमारे दहा तास वेळ स्क्रीनसमोर जातो.

यामुळे डोळ्याचे, मेंदूचे आणि अन्य अनेक आजार होण्याची भीती आहे. लहान वयात अशा आजारांना मुळे बळी पडू शकतात.

कोरोना साथीच्या काळात ऑनलाईन शिक्षण घेणं हे ठीक आहे. कारण इथे दुसरा पर्याय नाही. कोरोना काही कालावधीनंतर संपेल त्यानंतर शिक्षण व्यवस्था पूर्वपदावर येईल. पण ऑनलाईन शिक्षण कायम ठेवणं धोक्याचं आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे.

ऑनलाईन शिक्षण घेत असताना पालक आणि शिक्षकांची जबाबदारी देखील तेवढीच वाढणार आहे. आपला पाल्य नेमकं काय शिकतो, कोणत्या गोष्टी सर्फिंग करतो हे पाहणं फार गरजेचं आहे.

प्रश्न : ऑनलाईन शिक्षण सर्वांना घेता येऊ शकते का?

उत्तर : नाही. ऑनलाईन शिक्षण सर्वांना घेता येत नाही. मी स्वतः पालिकेच्या शाळेत शिक्षण घेतलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. पिंपरी-चिंचवड, पुणे यांसारख्या शहरांच्या ठिकाणी पालिकेच्या शाळेत जाणारी मुले सर्वसाधारण कुटुंबातील असतात. घर लहान आणि कुटुंब मोठं असतं. त्या गोंधळात ऑनलाईन शिकता येणार नाही.

देशातील अनेक भाग असे आहेत, त्या भागात अजूनही वीज, इंटरनेट, मोबईल, संगणक यांसारख्या ऑनलाईन शिक्षणासाठी लागणा-या मुलभूत गोष्टी पोहोचलेल्या नाहीत. तसेच अनेक लहान विद्यार्थ्यांना संगणक, मोबईल हाताळता येत नाही.

पालकांकडून शिकायचे, तर पालक अशिक्षित असल्याने तेही शिकवू शकत नाहीत. मोबईल फोन वापरणे म्हणजे तो उत्तमरीत्या हाताळता येणे असे नाही. त्यामुळे या तांत्रिक बाबी आहे, ज्या ऑनलाईन शिक्षणात अडथळा ठरू शकतात.

कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणाच्या अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असतात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी असा खेळ होणं म्हणजे देशाच्या भविष्याशी खेळल्यासारखं आहे. पण कोरोनाच्या काळात पर्याय नसल्याने जे चाललंय ते चाललंय.

प्रश्न : तुमच्या शिक्षकांच्या काही आठवणी आहेत ?

उत्तर : हो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. तसाच माझ्याही आयुष्यात माझ्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. मला दोन आठवणी सांगायला आवडेल. महापालिकेच्या शाळेत शिकत असताना मोरे सर म्हणून आमचे मुख्याध्यापक होते. त्यावेळी सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व्हायचा. मी चौथीत असताना सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होता.

माझ्या आईची इच्छा असायची की, मी भाषण करायला हवं. आईने शिक्षकांना सांगून मला भाषण लिहून दिलं. मी ते पाठांतर करून गेलो. माझी भाषणाची पहिलीच वेळ होती. सरांनी माझं नाव पुकारलं मी मंचावर गेलो आणि मुलांना बघून खूप घाबरलो. मी अक्षरशः रडलो.

त्यावेळी मोरे सर पुढे आले आणि म्हणाले की, ‘सातवीचे विद्यार्थी सोडून जात असल्यामुळे अमितला दुःख झालं आहे. तो घाबरलेला नाही. तो बघा आता कसा भाषण करतो ते.’ त्यानंतर मोरे सरांनी मला बाजूला घेतले आणि विश्वास दिला. त्यानंतर मी मंचावर गेलो आणि अस्खलित भाषण केलं.

पहिल्याच भाषणाच्या वेळी प्रचंड टाळ्या मिळाल्या. सर्व मुलांनी माझं फार कौतुक केलं. मोरे सरांनी विश्वास दिल्यामुळे हे शक्य झालं. भाषण करण्याचा तो आत्मविश्वास अजूनही माझ्यात आहे. आत मी कितीही प्रेक्षक असले तरी उत्तमरीत्या माझी मते मांडू शकतो.

दुसरी आठवण अशी की, शाळेत इंग्रजी विषयाचे मछाले सर होते. मी आठवीत होतो. पालिकेच्या शाळेत परीक्षेला एका बाकावर दोन विद्यार्थी बसतात. चाचणी परीक्षेत माझ्या शेजारी चौथीच्या एका मठ्ठ विद्यार्थ्याचा नंबर आला. इंग्रजीचा पेपर होता. माझा इंग्रजी विषय सुरुवातीपासून उत्तम आहे. त्यामुळे मी माझा पेपर सोडवून माझ्या शेजारी असलेल्या मुलाला पेपर लिहायला मदत केली.

सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने म्हणा, तो चौथीचा विद्यार्थी इंग्रजी विषयात वर्गात पहिला आला. त्याला 30 पैकी 26 गुण मिळाले होते. मछाले सर अचंबित झाले. त्यांनी त्या विद्यार्थ्याला विचारले, त्याने सर्व हकीकत सरांना सांगितली.

मी वर्गात बसलेलो असताना, मछाले सर त्या विद्यार्थ्याला घेऊन आमच्या वर्गात आले आणि म्हणाले, ‘या विद्यार्थ्याला पेपर कोणी सोडवून दिला आहे. त्याचा वर्गात पहिला नंबर आला आहे. ज्याने त्याला मदत केली आहे त्यांनी सांगा, मला त्या मदत करणा-या विद्यार्थ्याचा सत्कार करायचा आहे’.

मी लगेच हात वर केला आणि पुढे गेलो. सरांनी खूप प्रेमाने पुढे बोलावून जोरदार कानशिलात लगावली. तेंव्हापासून मी कानाला खडा लावला आणि निश्चय केला की, आयुष्यात कधीही खोटं काहीच करायचं नाही.

प्रश्न : एक आदर्श शिक्षक कसा असायला हवा?

उत्तर : शिक्षकाचा दर्जा खूप वरचा आणि मोठा आहे. शिक्षक दिसले की विद्यार्थी त्यांच्यासमोर नतमस्तक होतोच. ही शिक्षकांची सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे मत, अडचणी ऐकून घेण्याची क्षमता प्रत्येक शिक्षकामध्ये प्रचंड असावी.

त्यावर विद्यार्थ्याचे समाधान होईपर्यंत समजावून सांगण्याचे अथक काम शिक्षकाने करायला हवे. एकदाच सांगून सर्व विद्यार्थ्यांना समजत नाही, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या कलाने किंवा त्यांच्या पद्धतीने समजावून सांगणे गरजेचे आहे. त्यासाठी संयम हा गुण महत्वाचा आहे.

शिक्षकाकडे त्याच्या विषयाचे ज्ञान अपग्रेड असलेच पाहिजे. नसेल तर ते मिळविण्यासाठी त्याने सतत धडपडत राहायला हवे. शिक्षक ज्ञानासाठी धडपडणारा असेल तर तो विद्यार्थ्यांना तळमळीने शिकवू शकतो.

शिक्षकाने कायम एक विद्यार्थी बनून सुरुवातीला ज्ञान ग्रहण करावे, त्यानंतर शिक्षक म्हणून सर्वांना सांगावे. ज्ञानी, मितभाषी, प्रसंगी कठोर आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगिक विकास करणारा आदर्श शिक्षक असतो.

प्रश्न : विद्यार्थ्याला शिक्षा केली म्हणून अनेक शिक्षकांवर गुन्हे दाखल होतात, याबाबत काय सांगाल?

उत्तर : शिक्षकांची बाजू मला इथं मांडलीच पाहिजे. शिक्षकांचे काही बाबतीत कठोर होणे हे गरजेचे आहे. विद्यार्थी शाळेत जातो, तेंव्हा त्याच्या बौद्धिक आणि व्यक्तिमत्वाच्या विकासाची पूर्ण जबाबदारी शाळेची प्रसंगी शिक्षकांची असते. त्यामुळे चुका सुधारण्यासाठी शिक्षा करायला हवी.

शिक्षेचं स्वरूप सौम्य किंवा त्या विद्यार्थ्याला त्याच्या चुकांची जाणीव होईल एवढं असावं. उगाच शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर राग काढू नये. एखाद्या शिक्षकाकडून खूपच मोठी चूक झाली तर त्यावर कारवाई देखील करावी, त्याबद्दल दुमत नाही.

पण दोन्ही बाजू जाणून, विद्यार्थ्याचे हित लक्षात घेऊन या बाबी झाल्या पाहिजेत. पालकांनी इथे संयम राखला पाहिजे. शिक्षकांवर विश्वास ठेवणं, ही देखील पालकांची जबाबदारी आहे.

प्रश्न : केंद्र सरकारने आणलेल्या शिक्षण धोरणाबाबत काय सांगाल?

उत्तर : केंद्र सरकारने नुकतेच आणलेले शिक्षण घोरण खूप चांगले आहे. शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करत असताना शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अनेक नवीन आणि सकारात्मक गोष्टी पुढे आल्या आहेत.

येत्या 10-15 वर्षांच्या काळात यामुळे शिक्षण क्षेत्रात नक्कीच सकारात्मक मोठे बदल होतील. त्या धोरणाचं मी स्वागत करतो.