Patan Flood Ground Report : अबब! हत्ती व्हावले… एवढा पाऊस!

एमपीसी न्यूज (प्रमोद यादव) – पाटण परिसरातील अतिवृष्टीचा चित्तथरारक अनुभव ‘एमपीसी न्यूज’चे प्रतिनिधी प्रमोद यादव यांनी घेतला. वाचा हत्ती व्हावल एवढ्या पावसाचा ग्राऊंड रिपोर्ट त्यांच्याच शब्दांत….

मागील तीन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. पावसाचा सर्वाधिक फटका सातारा, रत्नागिरी, रायगड, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना बसला. अतिवृष्टीमुळे शेतीचे अपरिमित नुकसान झाले तसेच, मोठी जीवितहानी देखील झाली आहे. भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आणि त्याखाली घरे गाडली गेली. अनेक लोकं सुखरूप बाहेर काढली तर, अनेक मृत झाली अजूनही काही बेपत्ता आहेत.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात मागील तीन दिवसांत विक्रमी पावसाची नोंद झाली. यामुळे तालुक्यात मोठं नुकसान झाले आहे.

”हत्ती व्हावले”

अभूतपूर्व, बेभान, तुफान, ढगफुटी आणि बरंच काही….. ‘पण, असा पाऊस आम्ही पाहिलाच नाही यापूर्वी’ हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडी आहे. तसं पाहिलं तर आमच्या भागात पावसाची नेहमीच कृपादृष्टी राहिली आहे. ‘मुसळधार’ हा शब्द आमच्यासाठी तसा परवलीचा त्यासोबत वादळ, तुफान वारे, वीजांचा कडकडाट हे ठरलेलेच. मागील दोन दिवसांत आमच्या तालुक्यातील (पाटण, सातारा) प्रत्येकजण एका चित्तथरारक अनुभवातून गेला हे खरं. 2007 साली आम्ही दहावीत शिकत असताना असाच पाऊस झाला होता पण, त्याची भिषणता एवढी नव्हती. मागील दोन दिवसांत झालेला पाऊस हा विक्रमी तर होताच सोबत अनेक अर्थान संसार उद्धवस्त करणारा, शेतीचे अपरिमित नुकसान करणारा आणि अनेक सुन्न करणारे अनुभव मागे ठेवून जाणारा होता.

कोयना धरण परिसर, पाटण आणि कोयना नदीकाठच्या गावांना पूर परिस्थिती नवीन नाही. मात्र, यावेळी पावसामुळे झालेले अपरिमित नुकसान हे ‘न भूतो न भविष्यती’ असेच आहे. काही दिवसांपूर्वी जूनच्या मध्यावर झालेल्या ढगफुटीमुळे शेतकरी आणि नदी काठच्या गावांत मोठं नुकसान झाले. उभं राहिलेलं पिकं वाहून गेलं, जमिनी खचल्या, डोंगरमाथ्यावर भूस्खलन झाले यातून शेतकरी सावरत होता. नव्यानं जमिन कसून संसार उभारत होता. इतक्यात पुन्हा एकदा आस्मानी संकटान आपला कहर माजवला आणि होत्याच नव्हतं झालं.

नुकतीच लागण केलेली भात शेती रोपा सहीत वाहून गेली, बांध खचले, काही ठिकाणी पिका सहीत शेती वाहून गेली, ऊस मोडून पडले, नदी पात्रातून बाहेर आलेल्या पाण्यामुळे ऊस शेती आणि इतर पिकांचे नुकसान झाले, विहीर, वीज घरे मोडून पडली आहेत, डोंगर माथ्यावर भूस्खलन झाल्याने घरांची पडझड झाली. चहूबाजूंनी पूर असल्याने माणसं जागच्या जागी अडकून पडली. नजर पोहोचेल तिथवर सगळीकडे फक्त पाणीच पाणी, रस्ते, नाले, ओढे यातून त्यांच्या क्षमतेच्या तिप्पट ते चौपट पटीने पाणी वाहून गेले. नदी काठच्या शेतजमिनी वाहून जाऊन फक्त खडक उरला आहे त्याठिकाणी आता, आपल्या उजाड माळरानाकडे हताश नजरेने पाहत उभा राहिलेला शेतकरी डोळ्यासमोरून जात नाही.

‘पाटण तालुक्यात विक्रमी अतिवृष्टीमुळे मोरगिरी विभागातील आंबेघर, कोयना विभागातील ढोकावळे, बरळी, मिरगाव, कामरगाव, झाकडे, कदमवाडी, देशमुखवाडी येथे भूस्खलन होऊन घरांवर दरडी कोसळल्या आहेत. यात तब्बल 39 जण बेपत्ता झाले असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. आमच्या गावा शेजारील बोंद्री गावातील एक युवक ओढ्याला आलेल्या पाण्यातून वाहून गेला आहे. मानवी साखळी करुन पुलाच्या पाण्यातून रस्ता पार करण्याचा तिघेजण प्रयत्न करत होते दोघेजण बचावले एकजण वाहून गेला. दिवशी घाटात दरड कोसळून एक जण ठार झाला असून दोघे जखमी झाले आहेत. असे एकूण 9 व जिल्ह्यात इतर ठिकाणी 7 जण ठार झाले आहेत.’

पाटण तालुका व कोयना धरण परिसरातील नागरिकांनी अनेक संकटे पाहिले आहेत आणि त्यावर मात देखील केली आहे. मग ते पुनर्वसन असो, भूकंप असो की दरवर्षी बसणा-या पुराच्या पाण्याचा फटका असो. या भागातील सर्वसामान्य नागरिक पुन्हा उभा राहिला आहे. पण, यावेळी आलेल्या संकटातून सावरण्यासाठी त्याला मोठं बळ दिले पाहिजे. सरकार मदत म्हणून आजवर पदरात भीकच टाकत आलीय… पण, दिखाव्यापोटी पंचनामे करून त्यासाठी हजारो कागद गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट किमान करु नये एवढीच अपेक्षा. जीवितहानी आणि घरे गमावलेल्या लोकांना सरकारने तर मदत करावीच सोबत शक्य त्या प्रत्येकानं मदतीचा हात पुढे करावा.

शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरतोय पाणी कमी होईल तसे पावसामुळे झालेली नुकासानी समोर येत आहे. शेती वाहून गेल्याने काही ठिकाणी नुसते खडक उरले आहेत, घरांची पडझड, जनावरे मरुन पडली आहेत तर, अनेकजण बेपत्ता आहेत. दोन ते तीन दिवस सुरू असलेल्या निसर्गाच्या प्रकोपाचे विदारक चित्र बघून डोळ्यांच्या कडा पाणावल्या शिवाय राहत नाहीत. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाचा सामना आपण सर्वजण करत आहोत. आर्थिक बजेट कोलमडले असताना हे नवं संकट म्हणजे जखमेवर मीठ चोळल्या सारखे आहे. या संकटातून सावरण्याचे प्रत्येकाला बळ मिळो हीच मनोकामना आणि ही परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत होवो हीच सदिच्छा.

आमच्याकडे जेष्ठ नागरिक पाऊस किती झाला हे सांगण्यासाठी म्हणायचे, ‘हत्ती व्हावल (वाहून जाईल) एवढा पाऊस झाला’. यावेळी मात्र एवढा पाऊस झाला की खरंच ‘हत्ती व्हावले’ असे म्हणायची वेळ आली आहे..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.