MPC News Exclusive: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर ‘ते’ करायचे अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज (श्रीपाद शिंदे) – कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृत रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यास कोणीही धजावत नव्हते. घरच्यांना मृतदेह देता येत नाही. स्मशानभूमीत जाता येत नाही. मयताच्या सर्व नातेवाईकांना देखील अंत्यसंस्कार करण्यासाठी उपस्थित राहता येत नाही, अशा नियमांच्या जाळ्यात समाज असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे स्वयंसेवक त्या मयत रुग्णांवर विधिवत अंत्यसंस्कार करत होते. या कामासाठी तीस जणांचे एक पथक विविध ठिकाणी कार्यरत होते. बजरंग दलाचे पुणे जिल्हा संयोजक कुणाल दिलीप साठे यांच्या खांद्यावर या मोहिमेच्या समन्वयाची जबाबदारी होती. एमपीसी न्यूजने त्यांच्या मुलाखतीतून त्यांचा कोरोना काळातील अनुभव जाणून घेतला आहे.

 

प्रश्न : कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांचे अंत्यसंस्कार करण्याचेच काम का निवडलंत?

उत्तर : 22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी भारत बंदची घोषणा केली आणि भारत बंद झाला ….तेव्हा पासून गरीब लोकांना दोन वेळच्या जेवणाची गरज आहे हे लक्षात येताच संघ आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फ़े लोकांना जेवण पुरविण्याचे काम सुरु झाले. ह्यात महत्वाची साथ लाभली ती म्हणजे इस्कॉन अन्नपूर्णा फौंडेशनची. त्यानंतर शहारात वाढत चाललेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन संघ आणि विश्व हिंदू परिषदने लोकसेवेकरिता आयुर्वेदिक काढा वाटप करणे, आरोग्य तपासणी करणे, अँटीजन टेस्ट करणे, आणि महत्वाचं म्हणजे ज्याला कोणाला आज पर्यंत जमलं नाही ते म्हणजे अंतिम संस्कार करणे हे काम हाती घेतले. त्याचे कारण ही तसेच होते. कोरोनाची लागणे होऊन आकस्मित मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती आणि प्रशासन सुद्धा ह्या कामात हतबल झाले होते. या संकटामध्ये आपल्या समाजासाठी हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार करण्याची जबाबदारी आपली आहे, ही बाब लक्षात घेऊन मी स्वतः ह्या कामात सहभागी झालो.

 

प्रश्न : काम करताना आलेल्या अडचणी आणि संभाव्य धोक्यांबाबत काय सांगाल?

उत्तर : संभाव्य धोका एवढाच कि, जे कार्यकर्ते ह्या अंतिम संस्कार करत आहेत, ते आपलं सर्वस्व त्याग करून हे काम करत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेह हातात घेत असताना, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करत असताना आपल्याला ह्या रोगाची लागण होऊ नये हीच खूप चिंतेची आणि काळजीची बाब होती.
अंतिम संस्कारचे काम करताना पाहिल्यांदा अडचणी आल्या. पण संघटनेची ताकत अडचणीच्या काळातच काम करण्याची शिकवण देते. त्यामुळे अडचणींचा सामना करून त्यातून वाट काढत कार्य पूर्णत्वास नेले.

 

प्रश्न : अंत्यसंस्काराचे काम करताना काय काळजी घेता?

उत्तर : अंतिम संस्कारचे काम करताना आम्ही स्वतः डॉक्टरांचा सल्ल्या नुसार हे काम हाती घेतले. पीपीई किट घालून पूर्ण सॅनिटाझेअशन करत काम पूर्ण करून पुन्हा स्वतःला सानिटीझेशन करूनच पीपीई कीट काढणे आणि घरी जाऊन कपडे वेगळे ठेवणे व अंघोळ करणे एवढी काळजी घेत होतो.

 

प्रश्न : कामाची सुरुवात कशी झाली? किती स्वयंसेवक आणि कोणकोणत्या ठिकाणी काम केलं?

उत्तर : खरंतर एक जवळच्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला आणि स्मशान भूमीतील तो प्रकार बघितल्यावर आता आपल्या सारख्या तरुणांची गरज समाजाला आहे,हे लक्षात घेऊन सुरुवात केली. तसेच संख्येत वाढ होत होती त्यामुळे संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी प्रत्येक स्मशान भूमीत प्रत्येकी सहा कार्यकर्ते असे एकूण तीस कार्यकर्त्यांची टीम काम करत होती. ज्या ज्या ठिकाणी डीझेल शववाहिका आहेत,त्या त्या स्मशान भूमीत आम्ही काम केले.

 

प्रश्न : कामाचं स्वरूप काय आहे?

उत्तर : कामाचं स्वरूप हेच कि,अंतीमदेह हातात आला की तो कोणत्या जाती धर्माचा आहे हे न पाहता कुटुंबाला सुद्धा ह्या शेवटचा वेळेत त्यांना हवेतसे सहकार्य करत कुटुंबाच्या सल्ल्यानुसार विधिवत कार्यक्रम करून अंतिम संस्कार करण्यात आले. ज्या मृतांच्या कुटुंबातील कोणीही येऊ शकत नाही, ज्यांना कोणीच नाही अशांची माहिती प्रशासनाला कळवत हिंदू पद्धतीने विधिवत कार्यक्रम करून अंतीमसंस्कार केले आहेत.

 

प्रश्न : घरच्यांसोबत असताना कशी काळजी घेता?

उत्तर : माझं काम अशा ठिकाणी असल्याने माझी आणि कुटुंबाची काळजी घेणं फार गरजेचं होतं. मी स्वतःला कुटुंबापासून थोडे दिवस वेगळं राहून स्वतःची आणि घरच्यांची काळजी घेतली.

 

प्रश्न : काम अजून सुरू आहे का? आणि ते कधीपर्यंत सुरू राहणार?

उत्तर : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे अंतिम संस्कार करत असताना आम्हाला येणारे अनुभव आम्ही लोकांसोबत शेअर केले. त्यातून जनजागृती केली आता मयत रुग्णाच्या कुटुंबातील एक तरी व्यक्ती अंत्यविधीसाठी सहभागी होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचा सकारात्मक परिणाम सुद्धा दिसत आहे. समाज स्वतः या कामासाठी पुढे येत आहे. यापुढे शक्य होईल तिथपर्यंत काम चालू राहणार आहे.

 

प्रश्न : भयाण शांततेत मानसिक स्वास्थ्य कसे जपता?

उत्तर : स्वतःला फिट ठेवण्यासाठी प्रथम स्वतःच्या आरोग्यची काळजी घेत आयुर्वेदिक काढ्याचे सेवन रोज करणे. नियमित व्यायाम करणे आणि पुरेशी झोप. यातून मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य आम्ही सगळेजण जपत आहोत.

 

प्रश्न : काम करताना मनाला भिडलेले काही अनुभव आहेत का?

उत्तर : गणेशोत्सव काळात आम्ही पुण्यात गणपती दर्शनासाठी गेलो होतो. अचानक एक फोन आला की पिंपरी गावातील आयुश्री हॉस्पिटल मधील एक अनोळखी व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मयत रुग्णाचे नातेवाईक मुंबई, पुणे आणि दिल्ली येथे असल्याने त्यांना अंतिम संस्कार करण्यासाठी येणं शक्य नाही. त्यानंतर आमच्या पूर्ण टीमने त्या मयत रुग्णाचा मयत दाखला काढण्यापासून ते अंतिम संस्कार करण्यापर्यंतचे काम केले. यात वेगळं काही वाटणार नाही. पण त्या मयत रुग्णाच्या नातेवाईकांची मयताच्या अंत्यविधीसाठी येण्याची इच्छा होती, पण ते येऊ शकत नव्हते. त्यामुळे आम्ही सर्व अंत्यविधी त्यांच्या नातेवाईकांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दाखवला.

त्या व्यक्तीचा अंत्यविधी मनाला चटका लावणारा होता. कुठला व्यक्ती, कुठून आला काहीच माहिती नाही. त्याला कोरोना होतो काय, त्याचे नातेवाईक येऊ शकत नाहीत काय आणि त्याचा अंतिमविधी करण्याचे सेवाकार्य आपल्या हातून घडते काय, हा विलक्षण आणि तितकाच मनाला चटका लावणारा हनुभव होता.

 

प्रश्न : सर्व स्तरातील यंत्रणांच्या सहकार्याबद्दल काय सांगाल?

उत्तर : कॉविड 19 चा प्रादुर्भाव बघता मी आणि माझी संघटना समाजात आणि प्रशासनाला कशी मदत करेल हे प्रयत्न आधी आम्ही केले. यात प्रामुख्याने पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अजित पवार यांची खूप साथ लाभली. प्रशासनाला आम्ही सहाकार्य करत, प्रशासन सुद्धा आमच्या हाकेला हाक देत. अशा पद्धतीने आम्ही लोकांसाठी काम केले.

 

प्रश्न : नागरिकांना काय आवाहन कराल?

उत्तर : लोकांनी स्वतःची काळजी घेत कोरोना ह्या महामारीला न घाबरता आरोग्य चांगले कसे राहील हि काळजी घेतली पाहिजे. अंतीम संस्कारासाठी कुटुंबांनी पुढाकार घ्यावा. आरोग्याची काळजी घ्यावी. भरपूर्ण व्यायाम करावा. जिथे शक्य आहे तिथे लोकसेवा किंवा प्रशासनाला पूर्ण मदत करावी. रक्तदान किंवा प्लामा दान करण्यास स्वतःहून पुढाकार घ्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.