MPC News Exclusive : 20 वर्षांपूर्वी पुण्यात आढळला होता रानगवा; जंगलात सुखरूप झाली होती रवानगी!

एमपीसी न्यूज (यशपाल सोनकांबळे) : तब्बल 20 वर्षांपूर्वी 4 जानेवारी 2000 साली कात्रज, भारती विद्यापीठ परिसरात भारतीय रानगवा आढळला होता. शेकडो लोकांच्या गोंधळात देखील त्यावेळी अपुरे मनुष्यबळ, साधनसामग्री असताना देखील सैरभैर झालेल्या रानगव्यावर नियंत्रण मिळविले गेले. 36 तासांनंतर रानगव्याला चांदोलीच्या जंगलात सुखरुपपणे सोडण्यात आले होते, अशी आठवण तत्कालीन माजी वनाधिकारी आणि वन्यजीव अभ्यासक प्रभाकर कुकडोलकर यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितली.

“त्यादिवशी पहाटे भारती विद्यापीठात रानगवा दाखल झाला. त्यानंतर वन विभागाला सकाळी सातच्या सुमारास वर्दी मिळाली. त्याला पाहण्यासाठी शेकडो लोकांची गर्दी झाल्यामुळे रानगवा बिथरला, सैरभैर धावू लागला. त्याचे वजन किमान 800 ते 1 हजार किलो इतके होते.

Pune News : चार तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान रानगव्याचा मृत्यू !

सुदैवाने पुण्याच्या दिशेला न वळता कात्रजच्या दिशेने वळाला त्याच्या मागे शेकडो लोक धावत होते. अखेर 12 तासांनंतर सायंकाळी 6 च्या सुमारास कात्रजच्या दरीतील जंगलात शिरल्यामुळे कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही.”

_MPC_DIR_MPU_II

“गव्याच्या वजनाच्या प्रमाणात भुलीचे एकच इंजेक्शन मारल्यानंतर काही मिनिटांमध्ये रानगवा बेशुद्ध झाला. त्याला कुठलीही इजा न करता मोठ्या गाडीत लोड केला. तो सुखरुपपणे ताब्यात आला. त्यावेळी तर आमच्याकडे अपुरे मनुष्यबळ होते, अत्याधुनिक साधनसामग्री नव्हती पण समयसूचकता आणि अनुभवातून घेतलेल्या योग्य निर्णयामुळे रानगवा जखमी न होऊ देता ताब्यात आला होता.

रानगवा हा दुर्मीळ प्राणी असल्यामुळे नागपूर येथील मुख्य कार्यालयातून परवानगी घेऊन पुन्हा पुढे प्रवास करत चांदोलीच्या जंगलात रानगव्याला सुरक्षितपणे सोडून देण्यात आले. त्यावेळी संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन तब्बल 36 तास चालले होते. त्यावेळचा थरार अजूनही डोळ्यासमोरून जात नाही.

Pune News : पुण्याच्या कोथरूड परिसरात अवतरला भलामोठा गवा

माझ्या ‘बिबट्या आणि माणूस’ या पुस्तकात हा प्रसंग सविस्तर लिहिला आहे. पण आज पुण्यातील कोथरूड येथे रानगवा आढळल्याची बातमी प्रसारमाध्यमांवर पाहील्यानंतर जुनी आठवण ताजी झाली.”

दरम्यान, कोथरूड येथील रानगवा रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान दगावल्याची दुर्दैवी बातमी आल्यानंतर कुकडोलकर यांनी निषेध व्यक्त केला. तसेच राज्यशासनाने आतातरी वन्यजीव संरक्षण व व्यवस्थापनाचे स्वतंत्र धोरण आणावे, मार्गदर्शक नियमावली तयार करावी जेणेकरून भविष्यात आणखी एखादा वन्यजीवाचा नाहक बळी जाऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.