MPC News Impact: ‘एमपीसी’चा दणका! अखेर पालिका प्रशासनास खडबडून जाग; कोविड केअर सेंटरसाठी पालिकेेने उचलले ‘हे’ महत्त्वाचे पाऊल 

एमपीसी न्यूज (गणेश यादव, प्रमोद यादव) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने रुग्णसंख्या आटोक्यात येताच घरकुलमधील कोविड केअर सेंटर आणि तेथील लाखो रुपयांची वैद्यकीय उपकरणे वा-यावर सोडल्याचे वृत्त ‘एमपीसी न्यूज’ने प्रसिद्ध करताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. दरम्यान, पालिकेने ‘सीसीसी सेंटर’मधील अस्ताव्यस्त पडलेले महागडे वैद्यकीय साहित्य, उपकरणांची आवराआवर सुरु केली असून तिथे सुरक्षारक्षकही नेमला आहे. त्याचबरोबर साहित्याची नासधूस करणा-यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले आहे.

रुग्णसंख्या आटोक्यात येताच महापालिकेने कोविड केअर सेंटर सोडले होते वा-यावर!

महापालिकेने कोरोनाच्या लक्षणेविरहित रुग्णांसाठी घरकुलमध्ये ‘सीसीसी’ सेंटर सुरु केले होते. महागडी वैद्यकीय उपकरणे, रुग्णाला लागणारे आवश्यक साहित्य, सोई-सुविधा उपलब्ध करुन दिल्या. सर्व साहित्यासह एका खासगी संस्थेला हे सेंटर संचलनासाठी दिले. त्यापोटी संस्थेला कोट्यवधी रुपयांची बिले अदा देखील केली होती.

जूनमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरताच महापालिका प्रशासनाने कोविड केअर सेंटर बंद केले. ठेकेदारानेही काम बंद केले. पण, महापालिकेने गरज संपताच तेथील महागडी वैद्यकीय उपकरणे आणि साहित्य वा-यावर सोडले. लाखो रुपयांचे साहित्य असतानाही तिथे सुरक्षा रक्षक नेमला नाही. ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविले नाहीत. कोणत्याही खोलीला साधे ‘लॉक’ लावण्याची तसदी देखील महापालिका प्रशासनाने घेतली नाही.

‘एमपीसी न्यूज’च्या वृत्ताची महापालिका प्रशासनाकडून तत्काळ दखल!

लाखो रुपयांच्या साहित्याची तोडफोड, चोरी, नासधूस होत असल्याचे ‘एमपीसी न्यूज’ने उघडकीस आणले. त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करताच महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी तत्काळ एमपीसी न्यूजच्या वृत्ताची दखल घेतली. संबंधित अधिका-यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. अधिका-यांनी जाऊन पाहणी केली. वैद्यकीय अधिका-यांनीही पाहणी करत माहिती घेतली. त्यानंतर उपाययोजना हाती घेतल्या.

महागडे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरु!

रविवारपासून तेथील साहित्यांची आवराआवर सुरु करण्यात आली असून साहित्य सुरक्षितस्थळी हलविले जात आहे. सुरक्षारक्षकही तैनात केला आहे. गरम पाण्यासाठी असलेले इलेक्ट्रीक गिझर, अग्निप्रतिबंधक उपकरणे, ऑक्सीजन सिलेंडर, टेबल, फॅन, बेड, गाद्या, चादर, खुर्च्या, दिव्यांगाचे साहित्य, ताट, ग्लास, सॅनिटायझर, रुमाल, थर्मास असे सर्व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरु आहे.

कोविड सेंटरमधील साहित्याची नासधूस करणा-यांविरोधात होणार पोलीस तक्रार – ढाकणे

याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, ‘एमपीसी न्यूज’ने याबाबतची माहिती उघड करुन प्रशासनापर्यंत पोहोचविली त्याबद्दल त्यांचे आभार! कोविड केअर सेंटरमधील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे तसेच तोडफोड झालेल्या साहित्याची दुरुस्ती केली जाणार आहे. तिथे ‘लॉक’ही लावण्यात येतील. सुरक्षारक्षकही नेमला आहे. साहित्याची नासधूस करणा-यांविरोधात पोलीस तक्रारही दाखल केली जाणार आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.